तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, तारिकने चौकशीत आय-20 कार स्फोटक सामग्री वाहतुकीसाठी वापरल्याचा खुलासा केला आहे. ही कार त्याने उमर उर्फ आमिर नावाच्या व्यक्तीकडे दिल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्यानंतर सुरक्षा दलांनी उमर उर्फ आमिरलाही ताब्यात घेतले असून या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.
फरीदाबादमध्ये उघडकीस आलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी दोघांचा थेट संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या मॉड्यूलचा धागा पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडे जात असल्याची शक्यता तपासली जात आहे.
advertisement
कारचं लोकेशन सापडलं, सीसीटीव्हीमध्ये दिसली संशियत कार
लाल किल्ला स्फोटप्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोट झालेल्या I-20 कारचा सीसीटीव्ही रूट मॅप तयार केला आहे. ही कार बदरपूर बॉर्डरवर शेवटची दिसली होती, जिथून ती दिल्लीमध्ये प्रवेश करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर कारने लाल किल्ला परिसरापर्यंत कोणता मार्ग घेतला, याचा सध्या शोध घेतला जात आहे.
स्फोट झालेली कार कोणाची?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती I-20 कार 2014 पासून तब्बल चार जणांना विकण्यात आली होती. सगळ्यात आधी सलमान नावाच्या व्यक्तीने 18 मार्च 2014 रोजी ही कार विकत घेतली होती. त्यानंतर ती देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकण्यात आली. पुढे ही कार सोनूकडे गेली. अखेरीस तारिकपर्यंत पोहचली. कारच्या पुनर्विकीचा व्यवहार तपासण्यात येत आहे. सोनूने तारिकला कार हस्तांतरीत करताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नसल्याची माहिती समोर आली आहे.
