दिल्लीत आम आदमी पक्षाने पहिल्यांदा 2013 मध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसच्या पाठिंब्यावर केजरीवालांनी सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2015 मधील मध्यावधी निवडणुका झाल्यात त्यात आपने एकतर्फी विजय मिळवत भाजप, काँग्रेसचा धुव्वा उडवला. त्यानंतर आपने इतर राज्यातही निवडणुका लढवल्या.
आम आदमी पक्षाने गोवा, गुजरात, हरयाणा आणि पंजाबमध्ये काँग्रेसच्या विजयाच्या गणित बिघडवले होते. आता या चार राज्यातील निवडणुकीच्या पराभवाची परतफेड दिल्लीत झालीय का, याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
'आप'चा काँग्रेसला धक्का...
गोवामध्ये 2017 काँग्रेससाठी अनुकूल स्थिती होती. मात्र, त्या निवडणुकीत आपने जवळपास 6 टक्क्यांहून अधिक मते घेतली होती. मतविभाजनाचा फायदा काही ठिकाणी भाजपला झाला. त्याच्या परिणामी काँग्रेसचा विजय हुकला. त्यानंतर 2022 मध्ये आप आणि तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला गोव्यात धक्का दिला. या दोन्ही पक्षांनी काँग्रेसचे गणित बिघडवले. निवडणूक निकालानंतर काँग्रेसच्या 7 आमदारांनी थेट भाजपात प्रवेश केला.
गुजरातमध्येही आपने काँग्रेसला धक्का देत विरोधी मतांवर ताबा मिळवला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने बंपर यश मिळवले. तर, काँग्रेसची धूळदाण उडाली. काँग्रेसला 27.28 टक्के मतांसह 17 जागा मिळाल्या. तर, आपला 12.92 टक्के मतांसह 5 जागांवर विजय मिळाला.
पंजाबमध्ये काँग्रेसला आपली सत्ता राखता आली नाही.अतिआत्मविश्वास आणि पक्षातील गटबाजीमुळे काँग्रेसला पराभवााचा धक्का बसला. काँग्रेसला सत्तेतून खेचत आपने विजय मिळवला. दिल्लीनंतर आपने पंजाबमध्ये सत्ता मिळवली. काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या हरयाणामध्ये काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी झाली नाही. त्याच्या परिणामी काही जागांवर मतविभागणीचा फायदा भाजपला झाला.
दिल्लीत आपचा पराभव, आघाडी नसणं भोवलं...
दिल्ली विधानसभेत आप आणि काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली. काही ठिकाणी आप आणि काँग्रेसमधील मतविभागणीचा फटका दोन्ही पक्षांना बसला. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनाही मतविभागणीचा फटका बसला. मतविभागणी झाली नसती तर केजरीवाल आणि सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला. दुपारी 1.30 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपला 46.39 टक्के मते मिळाली आहेत. तर आम आदमी पक्षाला 43.48 टक्के मते मिळाली आहे. तर, काँग्रेसला 6.38 टक्के मते मिळाली. या दोन्ही पक्षांनी आघाडी केली असती तर भाजपला ही निवडणूक अवघड गेली असती, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
आपमुळे काँग्रेसला 4 राज्यात धक्का बसला होता. त्यातील काही ठिकाणी काँग्रेस आणि आप या दोघांनाही आपल्या जागा वाढवण्यात यश आले असते. तर, काही ठिकाणी सत्तादेखील मिळाली असती.