नवी दिल्ली: सोमवारी देशासाठी अंतराळ विज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातून एकाच वेळी निराशा आणि आनंद देणाऱ्या बातम्या समोर आल्या. सकाळी इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला अपेक्षित यश मिळू शकले नाही, तर काही तासांतच ने लष्करी क्षमतेत मोठी झेप घेतल्याची माहिती जाहीर केली.
advertisement
इस्रोचा प्रयत्न, पण मोहिमेत अडथळा
सोमवारी सकाळी इस्रोने PSLV-C62 रॉकेटद्वारे EOS-N1 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला. प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच रॉकेट नियोजित मार्गापासून विचलित झाले. त्यामुळे मोहिम पुढे नेणे शक्य झाले नाही. इस्रोने स्पष्ट केले की सर्व ग्राउंड स्टेशन्सकडील डेटा गोळा करून संपूर्ण प्रक्रियेचे विश्लेषण केले जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला असता, तर पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात भारतासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला असता.
DRDO कडून मोठी लष्करी कामगिरी
इस्रोच्या अपयशानंतर काही तासांतच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) कडून सकारात्मक बातमी आली. DRDO ने मॅन-पोर्टेबल अँटी टँक गाईडेड मिसाईल (MPATGM) चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या चाचणीची अधिकृत माहिती सोमवारी जाहीर करण्यात आली.
ही तिसऱ्या पिढीची ‘फायर अँड फॉरगेट’ प्रकारातील क्षेपणास्त्र प्रणाली असून ती पूर्णपणे स्वदेशी आहे. विशेष बाब म्हणजे ही मिसाईल हालचाल करणाऱ्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करू शकते.
टॉप अटॅक क्षमता, आधुनिक टँकांसाठी मोठा धोका
अलीकडील चाचण्यांमध्ये MPATGM ने ‘टॉप अटॅक मोड’ची क्षमता दाखवून दिली. या पद्धतीत मिसाईल टँक किंवा आर्मर्ड वाहनावर वरून हल्ला करते, जिथे संरक्षण सर्वात कमकुवत असते. त्यामुळे आधुनिक टँकांवरील एक्सप्लोसिव्ह रिअॅक्टिव्ह आर्मर (ERA) सहज निष्प्रभ होते. ही चाचणी राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये झाल्याची शक्यता आहे. चाचणीदरम्यान चालत्या डमी टँकवर मिसाईलने अत्यंत अचूक वार केला.
लहान पण घातक
MPATGM प्रणालीमध्ये मिसाईल, लॉन्चर, टार्गेट अॅक्विझिशन सिस्टम आणि फायर कंट्रोल युनिटचा समावेश आहे. ही प्रणाली इमेजिंग इन्फ्रारेड (IIR) तंत्रज्ञानावर आधारित असून दिवस-रात्र, पाऊस किंवा ढगाळ हवामानातही प्रभावीपणे काम करू शकते. फक्त 14 ते 15 किलो वजनामुळे ही मिसाईल पायदळ सैनिक सहजपणे वाहून नेऊ शकतात. सुमारे 2.5 किलोमीटरची मारक क्षमता आणि टँडम वॉरहेडमुळे ही मिसाईल आधुनिक मुख्य युद्ध टँक भेदण्यास सक्षम आहे.
