ही घटना 9 जानेवारी रोजी उघडकीस आली. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या (PHED) कार्यालयाजवळ भाजीपाला आणि पेढ्यांचा डबा असलेली एक पिशवी आढळली. पिशवीवर कोणाचे नाव नव्हते, ती घेण्यासाठी कोणीच पुढे न आल्याने उत्सुकतेपोटी पिशवी उघडली गेली आणि तेच ठरले प्राणघातक.
पहिला बळी ठरला दशरू यादववंशी (50), PHED कार्यालयातील सुरक्षा रक्षक. त्यांनी पेढे चाखल्यानंतर तीव्र उलट्या व जुलाब सुरू झाले. उपचारादरम्यान 11 जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन न झाल्याने हा मृत्यू सुरुवातीला गूढ मानला गेला.
advertisement
पेढ्यांनी थांबवला नाही मृत्यूचा सिलसिला
तोच पेढ्यांचा डबा नंतर जवळील दुकानचालकाच्या कुटुंबाकडे गेला. पेढे खाल्ल्यानंतर 22 वर्षीय खुशबू काथुरिया, तिचे 72 वर्षीय आजोबा आणि कुटुंबातील इतर सदस्य गंभीर आजारी पडले. उपचार सुरू असतानाच खुशबू आणि तिच्या आजोबांचा मृत्यू झाला. तिची आई आणि बहीण मात्र थोडक्यात बचावल्या. अवघ्या तीन दिवसांत तीन मृत्यू आणि समान धागा तोच पेढ्यांचा डबा. यानंतर पोलिस तपासाने वेगळेच वळण घेतले.
सूडाचा कट, घरातूनच रचलेला
तपासात समोर आले की, खुशबूचा जानेवारी 2024 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर तिने सासरच्या मंडळींकडून छळ आणि गैरवर्तन होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. पोलिसांच्या मते, या आरोपांमुळे सासरच्या कुटुंबाला समाजात मोठा अपमान सहन करावा लागला. यातूनच सूडाची भावना निर्माण झाली. खुशबूचे सासरे झाडू कासर, दिर शुभम आणि नणंद शिवानी यांनी तिला गप्प करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
आर्सेनिक मिसळून ठरवून ठेवले पेढे
आरोपींनी पेढ्यांमध्ये आर्सेनिक मिसळले आणि ती पिशवी खुशबूच्या वडिलांच्या दुकानाजवळ ठेवल्याचा पोलिसांचा दावा आहे. खुशबू किंवा तिच्या कुटुंबातील कोणीतरी ते पेढे खाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र या कटात PHED सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला, जो या योजनेचा भाग नव्हता. पोलिसांच्या भाषेत तो मृत्यू “कोलॅटरल डॅमेज” ठरला.
फॉरेन्सिक अहवालाने उघड केला कट
फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालात पेढ्यांमधील आर्सेनिकचे प्रमाण अनुमत मर्यादेपेक्षा हजारो पटीने जास्त असल्याचे स्पष्ट झाले. इतके विष अनेकांचा जीव घेण्यासाठी पुरेसे होते. तांत्रिक आणि सायबर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
कोणते कलम लावले?
पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत खून आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या कटात आणखी कुणाचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.
