पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना 6 ऑक्टोबर रोजी गांधी विहार परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बराच प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली, पण तोपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते. फ्लॅटमध्ये शोध घेतला असता, रामकेश मीनाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि नंतर त्याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. सुरुवातीला पोलिसांना गॅस स्फोटामुळे झालेला अपघात असल्याचे वाटले.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजमुळे हत्येचे गूढ उलगडले
पण, मृतदेहाची स्थिती आणि खोलीची स्थिती पाहून पोलिसांना गोंधळात टाकले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळाभोवती असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. 5 ऑक्टोबरच्या रात्री फुटेजमध्ये दोन मुखवटा घातलेले पुरूष इमारतीत प्रवेश करताना दिसले. त्यानंतर पहाटे 2.57 वाजता एक तरुणी त्यांच्यापैकी एकासह बाहेर पडताना दिसली. त्यानंतर काही वेळातच रामकेशच्या फ्लॅटमध्ये आग लागली.
मुखवटा घातलेल्या पुरूषासोबत निघालेल्या तरुणीची ओळख अमृता चौहान अशी झाली, जी रामकेश मीनाची लिव्ह-इन पार्टनर होती. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल फोन बंद होता. घटनेच्या दिवशी पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस केले आणि ते गांधी विहारमध्ये सापडले. या पुराव्यांमुळे पोलिसांच्या संशयाला बळकटी मिळाली. अमृताला अटक करण्यासाठी पोलिसांनी मुरादाबादमधील अनेक ठिकाणी छापे टाकले.
अमृताने गुन्हा कबूल केला
18 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अमृताला अटक केली. पोलिसांनी अमृताची कठोर चौकशी केली तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. तिने तिच्या दोन साथीदारांची नावेही उघड केली. पोलिसांनी तिचा माजी प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे आणि त्यांना तुरुंगात पाठवले आहे. अमृता आणि तिच्या प्रियकराने मिळून संपूर्ण हत्येची योजना आखली होती. तिन्ही आरोपींनी प्रथम रामकेशचा गळा दाबून खून केला आणि नंतर त्याच्या शरीरावर तेल, तूप आणि दारू ओतून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना कसा आला संशय?
दरम्यान, पुरावे नष्ट करण्यासाठी आणि हत्येला अपघात असे भासवण्यासाठी, गॅस सिलिंडरचा व्हॉल्व्ह उघडून आग लावण्यात आली. तपासादरम्यान, पोलिसांना रामकेशचा मृतदेह अधिक गंभीर जळालेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह इतका गंभीरपणे जळाला होता की काही हाडे वितळली होती. यामुळे पोलिसांना हा प्रकार अपघातापेक्षा नियोजित खून असल्याचा संशय आला.
अमृता फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी
21 वर्षांची अमृता चौहान ही फॉरेन्सिक सायन्समध्ये बी.एस.सी.ची विद्यार्थिनी होती, तसंच ती सध्या कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.एस.सीचं शिक्षण घेत होती. रामकेश मीनाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अमृताने तिच्या फॉरेन्सिक सायन्समध्ये केलेल्या अभ्यासाचा पूर्णपणे वापर केला. याशिवाय अमृताला क्राईमच्या वेब सीरिज पाहण्याचीही आवड होती. अशाच क्राईम वेब सीरिज पाहून तिने रामकेशची हत्या अपघात दाखवण्याचा कट शिजवला.
रामकेश याच्याकडे अमृता चौहानचे बरेच खासगी फोटो आणि व्हिडिओ होते, हे व्हिडिओ आणि फोटो डिलीट करण्याची मागणी अमृताने रामकेशकडे वारंवार केली, पण त्याने याला नकार दिला. यानंतर अमृताने तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमित कश्यपसोबत संपर्क साधला. यात त्यांनी सुमितचा मित्र 29 वर्षांचा संदीप कुमार यालाही सहभागी करून घेतलं. फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी असताना अमृताला पुरावे नष्ट कसे करायचे, याची माहिती होती. तर सुमित हा गॅस सिलेंडरचा डिलिव्हरी वितरक होता, त्यामुळे गॅसचा स्फोट कसा करायचा, हे त्याला माहिती होतं. शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञानाचा आधार घेऊन अमृता आणि सुमितने रामकेशचा काटा काढला.
