कोण आहे अमृता चौहान?
या संपूर्ण कटामागील कथित सूत्रधार 21 वर्षीय अमृता चौहान ही उत्तर प्रदेशातील मुरादाबादची आहे. ती फॉरेन्सिक सायन्समध्ये बी.एससी.ची विद्यार्थिनी होती आणि सध्या कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.एससी.चे शिक्षण घेत होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अमृताला क्राइम वेब सिरीज पाहण्याची आवड होती आणि यातून प्रेरित होऊन तिने हत्येला अपघातासारखे दाखवण्याची योजना आखली. मे 2025 मध्ये तिची रामकेश मीणाशी भेट झाली आणि लवकरच त्यांची मैत्री नात्यात बदलली. त्यानंतर ते दिल्लीतील गांधी विहार येथील एका फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले.
advertisement
अमृताच्या कुटुंबाने यापूर्वी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते, अशी माहितीही समोर आली आहे. 8 जुलै 2024 रोजी कुटुंबाने एका वर्तमानपत्रात तिला त्यांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याची जाहिरात दिली आणि याचे कायदेशीर पुरावे उपलब्ध आहेत. हत्येचा खुलासा झाल्यानंतर, कुटुंबाने माध्यमांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
रामकेशकडे अमृताचे अश्लील व्हिडिओ
अमृता आणि 32 वर्षीय रामकेश मीणा यांचे नाते काही महिनेच टिकले. पोलीस चौकशीदरम्यान अमृताने उघड केले की रामकेशने तिचे काही खाजगी अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवले होते आणि ते हार्ड डिस्कवर सेव्ह केले होते. जेव्हा अमृताला या व्हिडिओंबद्दल कळले तेव्हा तिने रामकेशला ते डिलीट करण्यास सांगितले. पण, रामकेशने याला स्पष्टपणे नकार दिला आणि कारणं सांगितली, यामुळे त्यांचे नाते बिघडले. अमृताने रामकेशवर सूड उगवण्याचा निर्णय घेतला. खाजगी व्हिडिओ परत मिळवण्यासाठी आणि रामकेशला धडा शिकवण्यासाठी, अमृताने तिचा माजी प्रियकर सुमित कश्यपशी संपर्क साधला.
अमृताने एक्स-बॉयफ्रेंडसोबत रचला कट
अमृताने हा सगळा प्रकार 27 वर्षीय सुमित कश्यपला सांगितला. यानंतर त्यांनी रामकेशची हत्या करण्याचा कट रचला. या कटात त्यांनी सुमितचा मित्र 29 वर्षीय संदीप कुमारलाही सामील केले. संदीप एसएससी/सीजीएल परीक्षेची तयारी करत होता आणि तो पोलीस लाईन्समध्ये कंत्राटी कर्मचारी होता, तर सुमित गॅस सिलेंडर वितरक होता. फॉरेन्सिक सायन्सचा विद्यार्थी असताना, अमृताला पुरावे कसे नष्ट करायचे हे माहित होते. सुमितला गॅस सिलिंडरचा स्फोट कसा करायचा हे माहित होते. तिघांनी मिळून हार्ड डिस्क चोरून रामकेशला संपवण्याची संपूर्ण योजना आखली.
खूनाच्या रात्री काय घडले?
5 आणि 6 ऑक्टोबरच्या रात्री अमृता, सुमित आणि संदीपसह, रामकेशच्या गांधी विहारमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटवर पोहोचली. असा आरोप आहे की त्या तिघांनी प्रथम रामकेशचा गळा दाबला आणि नंतर काठ्यांनी त्याला मारहाण केली. यानंतर त्यांनी रामकेशच्या शरीरावर तेल, तूप आणि दारू ओतली आणि त्याला पेटवून दिले. सुमितने स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर घेतला, रेग्युलेटरचा नॉब काढला आणि तो मृतदेहाच्या डोक्याजवळ ठेवला. गॅसच्या स्फोटामध्ये रामकेशचा मृत्यू झाल्याचं दाखवण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर त्यांनी लोखंडी गेटची ग्रिल काढली आणि अमृताने तिचा हात आत घातला आणि बाहेरून दरवाजा लॉक केला. तिघंही रामकेशकडची हार्ड डिस्क, दोन लॅपटॉप आणि इतर सामान घेऊन पळून गेले. सुमारे एक तासानंतर, फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे रामकेशचा मृतदेह गंभीरपणे जळाला आणि त्याचे तुकडे झाले.
सीसीटीव्हीमुळे सापडले आरोपी
6 ऑक्टोबर रोजी पोलिसांना आगीची माहिती मिळाली तेव्हा सुरुवातीला तो अपघात असल्याचे दिसून आले. पण, स्वयंपाकघराऐवजी खोलीत सिलेंडरचे तुकडे सापडल्यानंतर आणि रामकेशच्या कुटुंबाला खून झाल्याचा संशय आल्यानंतर, पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, ज्यामध्ये दोन मास्क घातलेले पुरुष आणि एक तरुणी रात्रीच्या वेळी इमारतीत प्रवेश करत आणि काही वेळातच निघून जात असल्याचे दिसून आले. या महिलेची ओळख अमृता म्हणून पटली. पोलिसांनी अमृताचे मोबाईल लोकेशन रेकॉर्ड (सीडीआर) तपासले तेव्हा, घटनेच्या वेळी गांधी विहारमध्ये तिचा फोन सक्रिय होता, ज्यामुळे संशय आणखी वाढला.
पोलीस मुरादाबादला पोहोचले
अमृताचा फोन बंद झाल्यानंतर, अनेक पोलीस पथकांनी मुरादाबादमध्ये छापा टाकला. अखेर 18 ऑक्टोबर रोजी तिला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान अमृताने आपला गुन्हा कबूल केला आणि सुमित आणि संदीप यांचे नावही घेतले, असा पोलिसांचा दावा आहे. तिच्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी हार्ड डिस्क आणि रामकेशच्या काही वस्तू जप्त केल्या. 21 ऑक्टोबर रोजी सुमितला आणि 23 ऑक्टोबर रोजी संदीपला मुरादाबाद येथून अटक करण्यात आली. तिन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.
वेबसीरिज पाहिल्या, फॉरेन्सिक अभ्यासाचा वापर
अमृता चौहानने तिच्या फॉरेन्सिक सायन्समध्ये केलेल्या अभ्यासाचा वापर रामकेश मीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केला. तसंच पकडलं जाण्याची शक्यता कमी व्हावी म्हणून अमृताने क्राईमच्या वेब सीरिजही पाहिल्या.
