कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूर येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवरील गँगरेपच्या घटनेवर वादग्रस्त आणि संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. या वक्तव्यामुळे मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. ममतांनी म्हटलं की, महाविद्यालयांनी मुलींना रात्री उशिरा बाहेर जाण्यापासून थांबवायला हवं आणि मुलींनी स्वतःही रात्री बाहेर फिरणं टाळायला हवं. याच वेळी त्यांनी आश्वासन दिलं की, दोषींवर सर्वाधिक कठोर कारवाई करण्यात येईल.
advertisement
ममता बॅनर्जींचं वादग्रस्त वक्तव्य
ती एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. मग जबाबदारी कोणाची? ती रात्री 12.30 वाजता बाहेर कशी आली? मुलींना रात्री (कॉलेजच्या बाहेर) जाण्याची परवानगी देऊ नये. त्यांनाही स्वतःची काळजी घ्यायला हवी. त्या भागात जंगल आहे आणि पोलिस सर्वांची चौकशी करत आहेत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी ममतांवर पीडितेला दोष देण्याचा आरोप केला.
काय घडलं होतं दुर्गापूरमध्ये?
दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीवर 10 ऑक्टोबर रोजी रात्री तीन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित विद्यार्थिनी ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी आहे.
विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितलं की, ती आपल्या एका मित्रा सोबत काहीतरी खाण्यासाठी बाहेर गेली होती. पण नंतर दोन-तीन इतर पुरुष तिथे आले आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. तिचा मित्र तिला सोडून पळून गेला.
रात्री 10 वाजता तिच्या मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं की- तुमच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. आम्ही जलेश्वर येथे राहतो. माझी मुलगी इथे शिकते. तिचा एक मित्र तिला जेवायला घेऊन गेला. पण जेव्हा इतर पुरुष आले तेव्हा तो तिला सोडून पळून गेला. ही घटना रात्री 8 ते 9 दरम्यान घडली. हॉस्टेल थोडं लांब आहे आणि ती काहीतरी खाण्यासाठी आली होती. सुरक्षेची व्यवस्था अपुरी होती. एवढी गंभीर घटना घडली, तरी कोणी प्रतिसाद दिला नाही, काहीच कारवाई झाली नाही.
तीन आरोपी अटकेत, दोन फरार
असन्सोल-दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाने रविवारी सांगितले की- या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी जवळच्या गावातील रहिवासी आहेत. पीडितेचा फोन आरोपींकडे होता आणि त्यावरून मिळालेल्या कॉल लोकेशनमुळे आरोपींचा शोध लागला.
घटनांचा निषेध प्रत्येक राज्यात व्हायला हवा
तिघांना अटक झाली आहे. आम्ही कठोर कारवाई करू. अशा घटना जर इतर राज्यांत घडल्या तरी त्यांचा तितक्याच तीव्रतेने निषेध व्हायला हवा. अशा घटना मणिपूर, यूपी, बिहार आणि ओडिशामध्येही घडल्या आहेत. त्या राज्यांमध्येही सरकारांनी कठोर कारवाई करायला हवी. आमच्या राज्यात आम्ही एका-दोन महिन्यांत चार्जशीट दाखल केली आणि न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा दिली.
विद्यार्थिनीची तब्येत स्थिर
दुर्गापूरच्या उपविभागीय दंडाधिकारी (SDO) रंजन रॉय यांनी शनिवारी सांगितलं की- विद्यार्थिनीची स्थिती सध्या स्थिर आहे आणि तिची आई तिच्यासोबत आहे. विद्यार्थिनीला पूर्ण वैद्यकीय मदत दिली जात असून, आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी नमूद केलं.
विरोधकांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
या प्रकरणात भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री आणि बाळूरघाटचे खासदार सुकांत मजूमदार म्हणाले की- मुख्यमंत्री स्वतः गृहखाते सांभाळतात आणि स्वतः एक महिला आहेत, तरीसुद्धा त्यांचं हे वक्तव्य अत्यंत लाजिरवाणं आणि निषेधार्ह आहे. पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचं पूर्णपणे अपयश त्यांच्या खांद्यावर आहे. धक्कादायक म्हणजे, त्यांनी आता जबाबदारी खाजगी महाविद्यालयावर ढकलली आहे. काही महिन्यांपूर्वीच एका सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाली होती.”
भाजप प्रवक्ते अमित माळव्य यांनी म्हटलं की- ममतांनी मुलींनी रात्री बाहेर जाऊ नये असं सुचवलं आहे. म्हणजे त्या बाहेर गेल्या तर त्यांनीच बलात्काराला आमंत्रण दिलं असं सूचित होतं. ही पहिली वेळ नाही; त्या वारंवार पीडितेवर दोष टाकतात, आरोपींवर नाही.