या सर्व भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या C-17 विमानाने परत पाठवण्यात आले आणि प्रवासादरम्यान त्यांचे हात-पाय बेड्या ठोकून ठेवले होते. ३६ वर्षीय जसपाल सिंग हा गुरदासपूर जिल्ह्यातील हरदोरवाल गावातील आहे. त्याने सांगितले की, २४ जानेवारीला अमेरिकेच्या बॉर्डर पेट्रोलने त्याला पकडले होते.जसपाल सिंगने प्रवासासाठी मोठी रक्कम खर्च केली होती. त्याने सांगितले की, मी एजंटला सांगितले होते की, मला व्हिसाद्वारे योग्य मार्गाने अमेरिकेत पाठव, पण त्याने मला फसवले. त्याने या प्रवासासाठी तब्बल ३० लाख रुपये दिले होते.
advertisement
जुलै महिन्यात जसपाल ब्राझीलला पोहोचला आणि त्याला सांगण्यात आले की पुढील प्रवास हवाई मार्गाने होईल. मात्र, त्याच्या एजंटने फसवले आणि त्याला अनधिकृत मार्गाने सीमा ओलांडण्यास भाग पाडले. ब्राझीलमध्ये सहा महिने राहिल्यानंतर जसपाल अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना बॉर्डर पेट्रोलने त्याला पकडले. त्याला ११ दिवस ताब्यात ठेवण्यात आले आणि नंतर भारतात परत पाठवण्यात आले.
जसपाल म्हणाला, आम्हाला वाटले की, आम्हाला दुसऱ्या छावणीत नेले जात आहे. पण नंतर एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला भारतात परत पाठवले जात आहे. या प्रवासासाठी खूप मोठा खर्च झाला आणि संपूर्ण रक्कम उसने घेतली होती.
जसपालच्या चुलत भाऊ जसबीर सिंग म्हणाला, हे विषय सरकारकडून हाताळले जातात. आम्ही परदेशात कामासाठी जातो, मोठी स्वप्ने पाहतो, पण ती स्वप्ने आता उध्वस्त झाली आहेत.
पंजाबच्या एका परत आलेल्या नागरिकाने सांगितले की, आम्ही १७-१८ डोंगर पार केले. जर कोणी पाय घसरला, तर त्याला वाचवण्याची कोणतीही संधी नव्हती. अनेक लोक गंभीर जखमी झाले आणि त्यांना तसाच सोडून दिले गेले. आम्हाला वाटेत मृतदेह दिसले.प्रवासामध्ये १५ तास बोटीत काढावे लागले आणि ४०-४५ किमी चालावे लागले. प्रवासादरम्यान त्यांचे ३० ते ३५ हजापर रुपयांचे कपडे चोरले गेले.
होशियारपूरमध्ये बुधवारी रात्री परत आलेल्या दोन नागरिकांनीही आपला अनुभव सांगितला. हरविंदर सिंग जो ताहली गावचा रहिवासी आहे. तो ऑगस्टमध्ये अमेरिकेसाठी रवाना झाला होता. त्याने कतार, ब्राझील, पेरू, कोलंबिया, पनामा, निकाराग्वा आणि मेक्सिको मार्गे अमेरिकेत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पनामाच्या जंगलात त्याने एका व्यक्तीला मृत पाहिले आणि समुद्रात आणखी एकजण बुडताना पाहिला. हरविंदरने प्रवासासाठी तब्बल ४२ लाख रुपये खर्च केले होते.तो म्हणाल की, कधी कधी आम्हाला भात मिळायचा, तर कधी फक्त बिस्किटे.
विशेष म्हणजे ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन भेटीच्या काही दिवस आधी करण्यात आली आहे. दरम्यान, पंजाब पोलिस आणि गुप्तचर संस्थांसह विविध सरकारी संस्थांनी निर्वासितांची चौकशी केली, जेणेकरून कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड तपासता येतील.