नवी दिल्ली: भारताच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र कार्यक्रमाला मोठी चालना देणारी कामगिरी करत डीआरडीओच्या हैदराबादस्थित डीआरडीएल (Defence Research and Development Laboratory) ने हायपरसोनिक मिसाइल तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. शुक्रवारी डीआरडीएलने पूर्ण आकाराच्या, ‘अॅक्टिव्हली कूल्ड’ स्क्रॅमजेट कॉम्बस्टरची दीर्घकालीन ग्राउंड टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली.
advertisement
ही चाचणी 9 जानेवारी 2026 रोजी डीआरडीएलच्या अत्याधुनिक Scramjet Connect Pipe Test (SCPT) Facility येथे पार पडली. या चाचणीत स्क्रॅमजेट इंजिनने सलग 12 मिनिटांहून अधिक काळ स्थिर कार्यक्षमता दाखवली. हायपरसोनिक प्रॉपल्शन सिस्टिमच्या विकासातील हा एक अत्यंत निर्णायक टप्पा मानला जात आहे.
डीआरडीओने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “हैदराबाद येथील डीआरडीएलने हायपरसोनिक मिसाइल विकासात क्रांतिकारी यश मिळवले आहे. पूर्ण आकाराच्या, अॅक्टिव्हली कूल्ड स्क्रॅमजेट कॉम्बस्टरची 12 मिनिटांहून अधिक कालावधीची ग्राउंड टेस्ट यशस्वी झाली असून, ही चाचणी SCPT सुविधेत 9 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली.”
संरक्षण मंत्र्यांचे अभिनंदन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ, त्यांचे औद्योगिक भागीदार आणि शैक्षणिक संस्थांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, दीर्घकालीन कार्यक्षमतेच्या फुल-स्केल स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी ही भारताच्या हायपरसोनिक क्रूझ मिसाइल विकास कार्यक्रमासाठी मजबूत पाया ठरणार आहे.
का महत्त्वाची आहे ही चाचणी?
हायपरसोनिक क्रूझ मिसाइलसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे अत्यंत प्रचंड वेगावर (Mach 5 पेक्षा अधिक) दीर्घकाळ स्थिर ज्वलन (combustion) टिकवून ठेवणे. डीआरडीएलच्या या यशस्वी चाचणीमुळे भारताला हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या दिशेने मोठी झेप मिळाली आहे.
ही कामगिरी केवळ मिसाइल विकासापुरती मर्यादित नसून, भारताच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे प्रतीक मानली जात आहे. भविष्यातील हायपरसोनिक शस्त्र प्रणालींसाठी ही चाचणी निर्णायक ठरणार आहे.
