एका आदेशाने झाला पाकिस्तानचा थरकाप...
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले, “भारत कधीही नियंत्रण रेषेवर (LOC) कुठल्याही क्षणी हल्ला करू शकतो, अशा बातम्या मिळत आहेत. मात्र, पाकिस्तानही त्याला सडेतोड उत्तर देईल.” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
advertisement
भारतविरोधी आरोपांची पुनरावृत्ती
आसिफ म्हणाले, “ही चौकशी केल्यास हे उघड होईल की या हल्ल्यामागे भारत स्वतः की अंतर्गत कोणता गट जबाबदार आहे, आणि त्यामुळे भारताने लावलेले निराधार आरोप खोटे असल्याचे सिद्ध होईल.” हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अत्ता तरार यांनीही असाच इशारा दिला होता की, भारताचे हल्ले 24 ते 36 तासांत होऊ शकतात. मात्र, अद्याप तसा कोणताही हल्ला झालेला नाही.
पाक लष्कर प्रमुखांचाही युद्धसज्जतेचा इशारा
या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सैयद असीम मुनीर यांनी 5 मे रोजी देशाच्या प्रतिष्ठेचं आणि जनतेच्या सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर दिलं जाईल, असं सांगितलं. दरम्यान, भारतात पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे.
७ मे रोजी मॉक ड्रिलचे आदेश
या साऱ्या घडामोडींच्या दरम्यान भारतही सज्ज होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना 7 मे 2025 रोजी राष्ट्रीय पातळीवरील मॉक ड्रिल राबवण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद आणि युद्धसज्जतेची चाचणी करण्याचा यामागील उद्देश आहे.
