> भारताच्या समुद्रात काय घडलं?
डीआरडीओने शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्यासाठी स्वदेशी बनावटीचे अँटी-सबमरीन रॉकेट विकसित केले आहे. गेल्या 15 दिवसांपासून (23 जून-7 जुलै), भारतीय नौदलाने या एक्सटेंडेड रेंज अँटी-सबमरीन रॉकेट (ERASR) ची यशस्वी चाचणी घेतली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि उद्योगांचे अभिनंदन केले आहे. या चाचणीमुळे भारतीय नौदलाची 'स्ट्राइकिंग पॉवर' वाढली असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
advertisement
> वेगवेगळ्या रेंजवर 17 रॉकेटची चाचणी
गेल्या 15 दिवसांत, भारतीय नौदलाने डीआरडीओच्या पुणे येथील आर्मामेंट रिसर्च अॅण्ड डेवलपमेंट एस्टेब्लिशमेंट (ARDE) प्रयोगशाळेच्या सहकार्याने आयएनएस कवरत्ती युद्धनौकेपासून वेगवेगळ्या रेंजवर 17 रॉकेटची चाचणी केली. नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने देखील या चाचणीत मदत केली.
> पूर्णपणे स्वदेशी रॉकेट...
विशेष गोष्ट म्हणजे इरेजरची चाचणी स्वदेशी रॉकेट लाँचरद्वारे करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इरेजर हे पूर्णपणे स्वदेशी रॉकेट आहे, जे भारतीय नौदलाच्या युद्धनौकांमधून लढण्यासाठी वापरले जाते. त्यात ट्विन रॉकेट मोटर कॉन्फिगरेशन आहे, ज्यामुळे इरेजर वेगवेगळ्या रेंजवर अचूकतेने डागता येते. या अँटी-सबमरीन रॉकेटमध्ये स्वदेशी इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूज आहे.
> लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात...
चाचणी दरम्यान, रेंज व्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक टाइम फ्यूज फंक्शनिंग आणि वॉरहेडची देखील चाचणी घेण्यात आली. यशस्वी युजर-ट्रायलसह, इरेजर रॉकेट लवकरच भारतीय नौदलात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) आणि खाजगी कंपनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (नागपूर) हे दोन्ही सरकारी उपक्रम संयुक्तपणे इरेजर रॉकेटची निर्मिती करणार असल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली आहे.