दक्षिण लेबनॉनमध्ये असलेले भारतीय सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या (UN) ऑपरेशनचा भाग म्हणून तेथे तैनात आहेत. युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स इन साऊथ लेबनॉन (UNIFIL) अंतर्गत संकटग्रस्त दक्षिण लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक आपले कर्तव्य बजावत आहेत.
इस्रायलच्या गाझा हल्ल्यानंतर हिजबुल्लाहही हमासच्या बाजूने सामील झाला. लेबनॉनकडून इस्रायलवर सातत्याने रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. तेव्हापासून परिसरात तणाव वाढत आहे. लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेल्यानंतर परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर गेली आहे.
advertisement
भारतीय शांती सेना दक्षिण लेबनॉनमध्ये पूर्ण सतर्कतेने तैनात असून भारतीय सैनिक स्थानिक नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
भारतीय जवान सुरक्षित...
UNIFIL शी संबंधित असलेल्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण लेबनॉनमध्ये तैनात असणारे सगळे भारतीय सैनिक सुरक्षित आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना UNIFIL च्या सूत्रांनी सांगितले की, या भागात तणाव वाढल्यानंतरही 900 हून अधिक भारतीय जवान आपली जबाबदारी पार पाडत आहेत. सर्व भारतीय जवान सुरक्षित आहेत. इस्रायलच्या नॅशनल सिक्युरिटी कॅबिनेटने लेबनॉनमधील भूभागावरील कारवाईला मंजुरी दिली आहे. त्यानंतर इस्रायली फौजांनी कारवायांना सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे.
इस्रायलने दिली होती सूचना..
UNIFIL ने सांगितले की, लेबनॉनमध्ये जमिनीवरू कारवाई करण्याधी इस्रायल डिफेंस फोर्स (IDF) याची कल्पना दिली होती. त्यानंतर UNIFIL साठी काम करणारे जवान सतर्क झाले. UNIFIL ने संबंधितांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. त्याशिवाय, बफर झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करण्याचेही आवाहन केले.
UNIFIL च्या मोहिमेतंर्गत 50 देशातील जवळपास 10 हजार 500 जवान तैनात आहेत. UNIFIL चे मुख्य काम हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आणि नागरिकांची मदत करणे आहे.
