ऑपरेशन केलर हे भारतीय सैन्याचे एक विशेष दहशतवादविरोधी अभियान आहे. जे सध्या सुरू असलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' च्या समांतर चालवले जात आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्याने होणाऱ्या दहशतवादाविरुद्ध 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. तर ऑपरेशन केलर 13 मे रोजी शोपियां जिल्ह्यातील शोएकल केलर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरू करण्यात आले.
advertisement
भारतीय सैन्याने एका अधिकृत पोस्टमध्ये सांगितले की, ऑपरेशन केलर - 13 मे 2025 रोजी राष्ट्रीय रायफल्स युनिटने दिलेल्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारावर भारतीय सैन्याने शोध आणि नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. ज्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आणि तीन कट्टर दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.
ही कारवाई भारतीय सैन्य, जम्मू-कश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि गुप्तचर संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये टॉपचा लष्कर कमांडर शाहिद कुट्टे याचाही समावेश आहे. इतर दोघांपैकी एकाची ओळख अदनान शफी म्हणून झाली आहे. तर तिसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की शाहिद कुट्टे 2023 मध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि तो ‘ए’ श्रेणीचा दहशतवादी होता. तो अलीकडेच 22 एप्रिल रोजी कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही सामील होता. ज्यात 26 लोक मारले गेले होते. या हल्ल्याच्या चार दिवसांनंतर 26 एप्रिल रोजी प्रशासनाने कुट्टेचे घर जमीनदोस्त केले होते.
या कारवाईला खोऱ्यातील दहशतवादी कारवायांविरुद्ध मोठे यश मानले जात आहे. सैन्य आणि पोलिसांनी सांगितले की ऑपरेशन केलर अजूनही सुरू आहे आणि परिसरात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.