ज्या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे, ते स्थान स्वतःच विशेष आहे, असे पंतप्रधान म्हणाले. किल्ला राय पिथोरा हे ठिकाण भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी भूमी असून सुमारे हजार वर्षांपूर्वीच्या शासकांनी मजबूत आणि सुरक्षित तटबंदीने वेढलेले शहर वसवले होते. आज त्याच ऐतिहासिक शहर संकुलात इतिहासाचा एक आध्यात्मिक आणि पवित्र अध्याय जोडला जात आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. येथे येण्यापूर्वी आपण या ऐतिहासिक प्रदर्शनाचे तपशीलवार निरीक्षण केल्याचे त्यांनी सांगितले. भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आपल्या सानिध्यात असणे हे सर्वांसाठी एक मोठा आशीर्वाद आहे, असे ते म्हणाले. या अवशेषांचे भारतातून बाहेर जाणे आणि नंतर परत येणे, या दोन्ही घटना स्वतःच महत्त्वपूर्ण धडे आहेत. गुलामगिरी केवळ राजकीय आणि आर्थिक नसते, तर ती आपला वारसाही नष्ट करते, हाच यामागील धडा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या बाबतीतही असेच घडले. हे अवशेष गुलामगिरीच्या काळात देशाबाहेर नेले गेले आणि सुमारे सव्वाशे वर्षे देशाबाहेर राहिले, यांची त्यांनी आठवण करून दिली. ज्यांनी हे अवशेष नेले, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या वंशजांसाठी हे अवशेष केवळ निर्जीव, जुन्या वस्तू होत्या, असे ते म्हणाले. म्हणूनच त्यांनी हे पवित्र अवशेष आंतरराष्ट्रीय बाजारात लिलावात विकण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले. मात्र, भारतासाठी हे अवशेष आपल्या पूजनीय देवतेचा एक भाग आहेत, आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांचा सार्वजनिक लिलाव होऊ दिला जाणार नाही, असा निर्णय भारताने घेतला, हे त्यांनी जाहीर केले. पंतप्रधानांनी गोदरेज समूहाचे आभार मानताना सांगितले की त्यांच्या सहकार्यामुळे भगवान बुद्धांशी संबंधित हे पवित्र अवशेष त्यांच्या कर्मभूमी, त्यांच्या चिंतनभूमी, त्यांच्या महाबोधी भूमी आणि त्यांच्या महापरिनिर्वाण भूमीवर परत आले आहेत.
advertisement
“भगवान बुद्धांचे ज्ञान आणि त्यांनी दाखवलेला मार्ग संपूर्ण मानवजातीसाठी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही महिन्यांत या भावनेचा वारंवार अनुभव आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या काही महिन्यांत भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांनी जिथे जिथे प्रवास केला, तिथे श्रद्धा आणि भक्तीच्या लाटा उसळल्या, असे त्यांनी नमूद केले. थायलंडमध्ये, जिथे हे पवित्र अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तिथे एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत चाळीस लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली, असे मोदी यांनी सांगितले. व्हिएतनाममध्ये लोकांची भावना इतकी तीव्र होती की प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला आणि नऊ शहरांमध्ये सुमारे 1.75 कोटी लोकांनी या अवशेषांना आदरांजली वाहिली, असे पंतप्रधान म्हणाले. मंगोलियामध्ये हजारो लोक गांदन मठाबाहेर तासनतास थांबले होते आणि त्यापैकी अनेकांना भारतीय प्रतिनिधींना स्पर्श करण्याची इच्छा होती, कारण ते बुद्धांच्या भूमीतून आले होते, असे त्यांनी सांगितले. रशियाच्या कल्मिकिया प्रदेशात, केवळ एका आठवड्यात 1.5 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले. ही संख्या स्थानिक लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक आहे, असेही त्यांनी सांगितले. विविध देशांतील या कार्यक्रमांमध्ये, सामान्य नागरिक असोत किंवा सरकारप्रमुख, सर्वजण समान आदराने एकत्र आले होते, यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की भगवान बुद्ध सर्वांचे आहेत आणि ते सर्वांना जोडतात.
भगवान बुद्ध हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, आणि त्याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान मानतो असे पंतप्रधान म्हणाले. आपले जन्मगाव असलेले वडनगर हे बौद्ध शिक्षणाचे एक मोठे केंद्र होते आणि जिथे भगवान बुद्धांनी पहिला उपदेश दिला, ते सारनाथ ही आपली कर्मभूमी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आपण जेव्हा सरकारी जबाबदाऱ्यांपासून दूर असतो, अशावेळी आपण यात्रेकरू म्हणून बौद्ध स्थळांना भेटी दिल्या होत्या आणि पंतप्रधान म्हणूनही जगभरातील बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे भाग्य आपल्याला लाभले असल्याचे त्यांनी नमूद केले. नेपाळमधील लुंबिनी इथल्या पवित्र मायादेवी मंदिरात नतमस्तक होण्याचा मिळालेला अनुभव विलक्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जपानमधील तो-जी मंदिर आणि किनकाकु-जी ला दिलेल्या भेटीत, भगवान बुद्धांचा संदेश काळाच्या सीमा ओलांडणारा असल्याचे आपल्याला जाणवले, हा अनुभवही त्यांनी मांडला. चीनमधील शिआन येथील जायंट वाइल्ड गूज पॅगोडाला दिलेल्या भेटीचा अनुभवही त्यांनी उपस्थितांना सांगितला. इथूनच बौद्ध धर्मग्रंथ संपूर्ण आशियामध्ये पसरले आणि तिथे भारताच्या भूमिकेचे आजही स्मरण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंगोलियातील गंदन मठाला दिलेल्या भेटीत, जनतेचे बुद्धांच्या वारशासोबत असलेले गहीरे भावनिक नाते आपल्याला अनुभवता आल्याचे त्यांनी सांगितले. श्रीलंकेतील अनुराधापुरा इथे जया श्री महाबोधीचे दर्शनही आपण घेतले, हा अनुभव म्हणजे सम्राट अशोक, भिक्खू महिंदा आणि संघमित्रा यांनी रुजवलेल्या परंपरेशी जोडले जाण्याचा अनुभव होता, असे ते म्हणाले. थायलंडमधील वॉट फो आणि सिंगापूरमधील बुद्ध टूथ रेलिक मंदिराला दिलेल्या भेटीतून आपल्याला भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रभाव अधिक सखोलपणे समजून घेता आल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आपण ज्या ज्या प्रदेशांना भेटी दिल्या, तिथली भगवान बुद्धांच्या वारशाची प्रतीके मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. चीन, जपान, कोरिया आणि मंगोलियामध्ये आपण बोधीवृक्षाची रोपे नेली होती, ही बाबही त्यांनी नमूद केली. अणुबॉम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या हिरोशिमा शहराच्या उद्यानात (बॉटनिकल गार्डन) जेव्हा बोधीवृक्ष उभा असलेला दिसतो, तेव्हा त्यातून मानवतेबाबतचा किती गहिरा संदेश जात असतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही असे ते म्हणाले.
भारत केवळ राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थव्यवस्थेद्वारे जोडलेला नाही, तर त्यापेक्षाही गहिऱ्या बंधांनी जोडलेला आहे, आणि भगवान बुद्धांचा हा सामायिक वारसा याच भावनेचा पुरावा आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. भारत मन आणि भावनांनी, श्रद्धा आणि अध्यात्माने जोडलेला आहे. भारत केवळ भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचा रक्षकच नाही तर त्यांच्या परंपरेचा जिवंत वाहक देखील आहे ही बाब त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. पिप्रहवा, वैशाली, देवनी मोरी आणि नागार्जुनकोंडा इथे सापडलेले भगवान बुद्धांचे अवशेष म्हणजे बुद्धांच्या संदेशाची जिवंत ओळख असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भारताने या अवशेषांची विज्ञान आणि अध्यात्म अशा दोन्ही अंगाने, प्रत्येक स्वरूपातील जतन आणि सुरक्षेची सुनिश्चिती केली आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जगभरातील बौद्ध वारसा स्थळांच्या विकासात योगदान देण्याच्या बाबतीत भारत सातत्याने प्रयत्नशील राहिला असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. नेपाळमधील विनाशकारी भूकंपात एका प्राचीन स्तूपाचे नुकसान झाले, त्यावेळी भारताने त्या स्तुपाच्या पुनर्बांधणीसाठी मदत केली असल्याची माहिती त्यांनी दिली. म्यानमारमधील बागान इथे झालेल्या भूकंपानंतर भारताने अकरा पेक्षा जास्त पॅगोडांच्या संरक्षणाचे काम हाती घेतले होते असेही त्यांनी सांगितले. भारताच्या योगदानाची अशी अनेक उदाहरणे असल्याचे ते म्हणाले. भारतातही बौद्ध परंपरेशी संबंधित स्थळे तसेच अवशेषांचा शोध आणि संवर्धन करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. गुजरातचे वडनगर हे बौद्ध परंपरेचे मोठे केंद्र होते. आपण मुख्यमंत्री असताना तिथे बौद्ध धर्माशी संबंधित हजारो अवशेष सापडले होते, या घटनेचे स्मरण त्यांनी करून दिले. आज सरकार या अवशेषांचे संवर्धन आणि आजच्या पिढीला त्यांच्यासोबत जोडण्यावर भर देऊन काम करत असल्याचे ते म्हणाले. त्या अनुषंगानेच तिथे एक भव्य अनुभव देणारे संग्रहालय उभारले असून, या संग्रहालयातील मांडणीतून सुमारे 2500 वर्षांचा इतिहास समजून घेता येतो, असे त्यांनी सांगितले. अलिकडेच काही महिन्यांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला इथे बुद्ध काळातील एका मोठ्या बौद्ध स्थळाचा शोध लागला असून, या स्थळाच्या संवर्धनाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या दहा-अकरा वर्षांत भारताने बौद्ध स्थळांना आधुनिकतेशी जोडण्याचा प्रयत्न केला असल्याची बाबही पंतप्रधानांनी नमूद केले. बोधगया इथे कन्व्हेन्शन सेंटर तसेच मेडिटेशन अँड एक्सपिरियन्स सेंटर स्थापन केले असल्याचे त्यांनी सांगितले. सारनाथमधील धमेक स्तूपावर लाइट अँड साउंड शो सह बुद्धा थीम पार्क उभारले असल्याची माहिती त्यांनी दिली. श्रावस्ती, कपिलवस्तू आणि कुशीनगरमध्येही आधुनिक सोयीसुविधा विकसित केल्या आहेत, तेलंगणातील नलगोंडा इथे डिजिटल एक्सपिरियन्स सेंटर उभारले आहे. सांची, नागार्जुन सागर आणि अमरावतीमध्ये भाविकांसाठी नवीन सुविधा विकसित केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. भारतातील सर्व बौद्ध तीर्थक्षेत्रांसाठी उत्तम संपर्क जोडणीची सोय उपलब्ध असेल, याची खातरजमा करण्यासाठी आज देशात बौद्ध सर्किट तयार केले जात आहे, यामुळे जगभरातील भाविक आणि यात्रेकरुंना श्रद्धा आणि अध्यात्माचा गहिरा अनुभव घेता येईल असे ते म्हणाले.
बौद्ध वारसा नैसर्गिक पद्धतीने भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा, हा भारताचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. जागतिक बौद्ध शिखर परिषद तसेच वैशाख आणि आषाढ पौर्णिमा यांसारखे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम याच विचारातून प्रेरित आहेत, असे त्यांनी नमूद केले. भगवान बुद्धांचे अभिधम्म, त्यांचे शब्द आणि उपदेश मूळतः पाली भाषेत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले, तसेच पाली भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार प्रयत्नशील असून, म्हणूनच पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे धम्म त्याच्या मूळ स्वरूपात समजून घेणे आणि स्पष्ट करणे सुलभ होणार असून, बौद्ध परंपरेशी संबंधित संशोधनालाही बळ मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष भारताचा अमूल्य वारसा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. दीर्घ काळानंतर, सुमारे एका शतकाच्या प्रतीक्षेनंतर हे अवशेष पुन्हा देशात परतले असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील नागरिकांनी हे पवित्र अवशेष प्रत्यक्ष पाहून भगवान बुद्धांच्या विचारांशी नाते जोडावे आणि किमान एकदा तरी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे त्यांनी आवाहन केले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक तसेच देशातील सर्व तरुण- तरुणींनी हे प्रदर्शन नक्की पाहावे, असेही त्यांनी सांगितले. भूतकाळातील गौरव आणि भविष्यातील आकांक्षा यांना जोडणारे हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रदर्शनात देशभरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन करत, या उपक्रमाच्या यशासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, किरेन रिजिजू, रामदास आठवले, राव इंदरजित सिंह तसेच दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना यांची प्रमुख उपस्थिती होती.
