नमस्कार,
भारताच्या अनेक शतकांपूर्वीपासूनच्या संस्कृतीमध्ये आपल्या देशाला मातृभूमी असं संबोधलं गेलं आहे. आपण जन्मभूमीला आई मानतो आणि धरणीला माता म्हणतो.
आपल्या संस्कृतीत अशाचप्रकारे स्रीला परम आदरणीय तसंच पूजनीय मानण्याची परंपरा आहे. आपल्या विविधतेने नटलेल्या देशात आपल्या देवींनीही अनेक रूपं धारण केल्याचं वर्णन आहे. असुरांचा संहार करण्यासाठी या देवी एकीकडे काली आणि दुर्गेचं प्रचंड रूप घेऊन अवतरतात, तर दुसरीकडे शांती, समृद्धी आणि विद्या देणाऱ्या लक्ष्मी, सरस्वतीच्या रूपात प्रकटून आशीर्वाद देतात.
advertisement
आपल्या देशात स्त्रीला शक्तीचं स्वरूप मानलं गेलंय. स्त्री ही साक्षात शक्तीच आहे. आपल्या देशाची खरी शक्ती महिलांच्या सशक्तीकरणातच आहे. आपल्या देशातल्या महिलांनी कायमच दृढनिश्चय, शक्ती आणि साहस दाखवत मार्गक्रमण केलंय आणि वाटेत येणाऱ्या अनेक संकटांना न जुमानता त्या पुढेच चालत राहिल्या आहेत. आपल्या देशात महिलांच्या संरक्षणासंबंधी अनेक कडक कायदे तयार झाले असतानाही महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना असणं हे खूपच दुर्दैवी आहे. महिलांना कमी लेखणाऱ्या आपल्या समाजातील संकुचित मानसिकतेच्या व रूढीवादी घटकांशी महिलांचा सततचा संघर्ष सुरू आहे. समाजात अनेक बदल झालेही आहेत; पण काही सामाजिक भेदाच्या भावना आणि पूर्वग्रह अजूनही मूळ धरून आहेत जे महिलांच्या समानतेच्या मार्गात अडसर निर्माण करत आहेत.
एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांना आत्मपरीक्षण करून स्वत:लाच काही कठीण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आपण कुठे चुकलो आहोत? आणि सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो? याचा विचार देशातील प्रत्येकाने करायला हवा. कोणत्याही देशाचा विकास आणि यशासाठी महिलांची सुरक्षितता आणि त्यांना आदर देणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे.
आपण सगळ्यांनी मिळून आपल्या देशातील महिलांचा सन्मान आणि गौरव यांचं रक्षण करण्यासाठी तसंच त्यांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी संकल्प करणं आता अनिवार्य झालं आहे.
आपण महिला असण्याच्या दृष्टिकोनाला बाजूला सारून असाधारण कर्तृत्व करून दाखवत यश संपादन केलं आहे, अशा महिलांचा सन्मान करण्यात नेटवर्क 18 च्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. या महिलांनी त्यांना समाजाने घातलेल्या सगळ्या मर्यांदांना पार करून एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर उभं केलं आहे. त्यांनी समाजातील भेदभाव करणाऱ्या रूढी-परंपरांना आव्हान देऊन जबरदस्त यश मिळवलं आहे आणि या रूढींना एकप्रकारे गाडून टाकलं आहे.
आता अशी वेळ आली आहे की, आपण सगळ्यांनी मिळून एक अशी जनचेतना जागृत करू या जेणेकरून समाजातील महिलांबद्दल आदर-सन्मान वृद्धिंगत होईल आणि कोणत्याही महिलेला कुठल्याही वेळी कुठल्याही ठिकाणी असुरक्षित वाटणार नाही. नेटवर्क 18 ने सुरू केलेलं ‘शी-शक्ती’ अभियानही या व्यापक जनजागृतीचा भाग आहे. आपण सुरू केलेल्या या अभियानाला माझ्या विशेष शुभेच्छा.
धन्यवाद.
जयहिंद.