माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची प्रकृती खालावली आहे. गुलाम नबी आझाद पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले होते पण तिथे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना कुवेतमधील रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रकृती अस्वास्थामुळे आपला दौरा सोडून भारतात परतू शकतात, असे म्हटले जात आहे.
गुलाम नबी आझाद हे भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा भाग आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'बद्दलची माहिती सांगण्यासाठी खासदार आणि नेत्यांचे सात शिष्टमंडळ जगातील अनेक देशांमध्ये गेले आहेत. हे शिष्टमंडळ सौदी अरेबियाला पोहोचले होते आणि आता ते अल्जेरियालाही जाणार आहे. पांडा म्हणाले की गुलाम नबी आझाद यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्हाला सौदी अरेबिया आणि अल्जेरियामध्ये त्यांची या शिष्टमंडळात उणीव भासेल, असे त्यांनी म्हटले.
advertisement
आझाद यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, "कुवेतमध्ये कडक उन्हामुळे माझ्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. पण आता प्रकृतीला आराम पडत आहे. सर्व वैद्यकीय चाचण्यांचे निकाल सामान्य आहेत. सर्वांचे आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले.
शिष्टमंडळाचा भाग असलेले भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आझाद यांचे कौतुक केले आणि सांगितले की, प्रकृती खराब असूनही त्यांनी देशासाठी शिष्टमंडळाचा भाग होण्याचे मान्य केले.
2022 मध्ये सोडली होती काँग्रेस
गुलाम नबी आझाद हे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2022 मध्ये गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढवला होता.
जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष असण्यासोबतच, आझाद यांनी राज्याचे मुख्यमंत्री, केंद्र सरकारमध्ये अनेक वेळा मंत्री, काही राज्यांमध्ये काँग्रेसचे प्रभारी, सीडब्ल्यूसीचे सदस्य, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अशी अनेक मोठी पदे भूषवली आहेत.