जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 15 दिवसांनंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्तपणे 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. या मोहिमेत मंगळवारी रात्री उशिरा पीओकेमधील मुजफ्फराबाद, मदिरके आणि कोटली येथे एअर स्ट्राईक केली. भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे.
advertisement
पाकिस्तानने तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींसाठी अमेरिका, चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या दोन्ही देशांकडून मिळणाऱ्या संरक्षण साम्रगी, तंत्रज्ञानावर पा पाकिस्तान डरकाळ्या फोडत असतो. मात्र, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या संरक्षण सज्जतेचं पितळ जगासमोर उघडं झाले आहे.
पाकिस्तानचे जेएफ-17 पाडलं
बुधवारी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले तेव्हा भारताने पाकिस्तानचे जेएफ-17 लढाऊ विमान पाडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुलवामाच्या पंपोरमध्ये हे विमान पाडण्यात आले. शिवाय, पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी पुष्टी केली की भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानी हद्दीत तीन ठिकाणी - मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरचा अहमद पूर्व भाग येथे स्ट्राइक झाला.
पाकिस्तानच्या हवाई दलातील जेएफ-17 हे लढाऊ विमान पाकिस्तान आणि चीनने संयुक्तपणे तयार केले आहेत.
चिनी रडार फेल, भारतीय लढाऊ विमाने आल्याचा थांगपत्ताच नाही!
भारतीय लष्कराकडून झालेल्या अचूक आणि गुप्त कारवाईची पाकिस्तानकडे कोणतीही पूर्वसूचना नव्हती. भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याचा थांगपत्ताच पाकिस्तानला लागला नाही. त्यांच्या हवाई संरक्षण रडार प्रणालीला भारतीय हल्ल्याची माहिती मिळाली नाही.
पाकिस्तानचे रडार आधी ठरले निष्प्रभ
ही काही पहिल्यांदाची गोष्ट नाही. याआधी 2022 मध्ये भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आलं होतं, तेव्हाही पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला त्याचा माग काढता आलेला नव्हता. दोन दिवसापूर्वी झालेल्या पाकिस्तानच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. याचप्रमाणे, 2019 मधील बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळीही पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला भारतीय वायूदलाची हालचाल समजली नव्हती. त्यावेळीही रडारला भारतीय हवाई दलाने त्यांच्या हद्दीत प्रवेश केल्याचे जाणवले नाही.