दोन्ही आरोपी पहलगामचे रहिवासी...
एनआयए अधिकाऱ्यांच्या मते, अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. परवेझ अहमद जोधर, (बटकोट) आणि बशीर अहमद जोधर (हिल पार्क) हे दोघेही पहलगाम येथील रहिवासी आहेत.
पहलगाम येथील हल्ल्यापूर्वी दोघांनीही दहशतवाद्यांना अन्न, पेये आणि इतर रसद पुरवली होती. हल्ल्यापूर्वी दोघांनीही दहशतवाद्यांना बैसरन मैदानाबद्दल माहिती दिली होती. या ठिकाणी पोलीस अथवा इतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याची माहिती त्यांनी दिली होती, असे तपासात समोर आली.
advertisement
एनआयएच्या चौकशीत समोर धक्कादायक माहिती...
दहशतवाद्यांनी त्यांना आपल्या कटात सहभागी करून घेतलं. पहलगाममधील हल्ल्यातील तीन दहशतवादी हे पाकिस्तानची नागरिक होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी होते. अटक केलेले दोन्ही आरोपी फरार दहशतवाद्यांचे स्थानिक समर्थक असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. बैसरन मैदानात २६ निष्पाप लोकांना मारण्यापूर्वी दहशतवाद्यांना आश्रय या आरोपींनी दिला होता.
पहलगाम हल्लेखोर अजूनही फरार...
हल्ला करणारे दहशतवादी अजूनही फरार आहेत. या फरार दहशतवाद्यांचे हे स्थानिक समर्थक पकडले गेल्याने फरार दहशतवाद्यांचा ठावठिकाणा समजू शकेल असा अंदाज एनआयएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
परवेझ-बशीर यांनी दिला 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय
एनआयएच्या तपासानुसार, परवेझ आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्कमधील एका हंगामी ढोक (झोपडी) मध्ये तीन सशस्त्र दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. दोघांनीही दहशतवाद्यांना अन्न, राहण्याची जागा, रसद आणि इतर प्रकारची मदत पुरवली होती. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून एक-एक करून त्यांची हत्या केली. एनआयएने बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या कलम 19 अंतर्गत दोघांनाही अटक केली आहे.
दरम्यान, एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले की दोघांनाही आता अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करून रिमांडवर घेतले जाईल. यानंतर, पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यापासून ते अंमलबजावणी आणि त्यांच्या फरार होण्यापर्यंतच्या सर्व बाबींबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.