पाकिस्तानला भारताचं रोखठोक प्रत्युत्तर
संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भाषणाला भारताने कठोर प्रत्युत्तर दिले. भारताच्या स्थायी मिशनच्या फर्स्ट सेक्रेटरी पेटल गहलोत यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्यावर उघडे पाडत जोरदार हल्ला चढवला. त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवादाचे गौरवीकरण केले आहे आणि ते त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा अविभाज्य भाग बनले आहे.
advertisement
गहलोत यांनी स्मरण करून दिले की २५ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘रेसिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेला संरक्षण दिले होते, ज्याने जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या हत्याकांडाची जबाबदारी टाळली होती. त्यांनी हेही सांगितले की हेच ते राष्ट्र आहे ज्याने वर्षानुवर्षे ओसामा बिन लादेनला लपवून ठेवले आणि दहशतवादी तळ चालवण्याची कबुली त्यांच्या मंत्र्यांनीच दिली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत सदैव सज्ज
अलीकडेच भारतीय दलांनी पाकिस्तानातील अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचे पुरावे जगासमोर आले आहेत, असे गहलोत यांनी अधोरेखित केले. त्यांनी व्यंग्यात्मक भाषेत म्हटले की, जळालेल्या धावपट्ट्या आणि उद्ध्वस्त झालेले हॅंगर जर पाकिस्तान आपला विजय समजत असेल, तर त्यांना तसे मानू द्या. पण खरी गोष्ट अशी आहे की पाकिस्तान भारतातील निष्पाप नागरिकांवरील दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार आहे आणि भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहील.
चर्चेतून मुद्दे सोडवू, तिसऱ्या पक्षाला स्थान नाही
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणतेही प्रलंबित मुद्दे फक्त द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवले जातील, यावर गहलोत यांनी पुन्हा भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की या प्रक्रियेत कोणत्याही तिसऱ्या पक्षाला स्थान नाही आणि हे भारताचे जुने व ठाम धोरण आहे.
पेटल गहलोत या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या सल्लागारांपैकी एक असून, त्यांची २०२३ मध्ये फर्स्ट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली. त्याआधी त्यांनी युरोपियन वेस्ट डिव्हिजनमध्ये अंडर सेक्रेटरी म्हणून काम केले तसेच पॅरिस आणि सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय मिशनमध्येही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांना संगीताची आवड असून, त्या गिटार वाजवतानाचे व्हिडिओ नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करतात. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून आर्ट्समध्ये पदवी घेतली, त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पोलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि अमेरिकेतील मिडलबरी इन्स्टिट्यूटमधून भाषा व अनुवादात मास्टर्स पदवी मिळवली.