लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खास डिझाइन करण्यात आलेली वंदे भारतची ही स्लीपर आवृत्ती अधिक आरामदायक, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाचा अनुभव देणार आहे. पूर्णपणे वातानुकूलित असलेली ही ट्रेन, तुलनेने परवडणाऱ्या दरात प्रवाशांना विमानप्रवासासारखा अनुभव देण्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.
वंदे भारत स्लीपरची वैशिष्ट्ये
या स्लीपर ट्रेनमुळे हावडा ते गुवाहाटी दरम्यानचा प्रवास सुमारे अडीच तासांनी कमी होणार आहे. त्याचा फायदा केवळ दैनंदिन प्रवाशांनाच नव्हे, तर धार्मिक पर्यटन आणि ईशान्य भारतातील पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात होणार आहे.
advertisement
ताशी 180 किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील. त्यामध्ये 11 थ्री-टियर एसी, 4 टू-टियर एसी आणि 1 फर्स्ट क्लास एसी डबा असेल.
सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेनमध्ये कवच प्रणाली आणि इमर्जन्सी टॉक-बॅक सिस्टीम बसवण्यात आली आहे.
या वंदे भारत स्लीपर ट्रेनची एकूण आसन व शयनक्षमता 823 प्रवाशांची आहे. त्यापैकी 611 प्रवासी थ्री-टियरमध्ये, 188 टू-टियरमध्ये आणि 24 फर्स्ट क्लास एसीमध्ये प्रवास करू शकतील.
भाडे आणि सुविधा
भारतीय रेल्वेने जाहीर केलेल्या दरांनुसार, 400 किमीपर्यंतच्या प्रवासासाठी थ्री-टियर एसीचे भाडे सुमारे 960 रुपये, टू-टियर एसीसाठी 1,240 रुपये, तर फर्स्ट क्लास एसीसाठी 1,520 रुपये इतके आहे.
सुमारे 1,000 किमी अंतराच्या प्रवासासाठी भाडे 2,400 ते 3,800 रुपयांदरम्यान असेल, जे बहुतांश विमान तिकिटांपेक्षा कमी आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही स्लीपर ट्रेन अधिक परवडणारा पर्याय ठरणार आहे.
प्रवाशांना या ट्रेनमध्ये पारदर्शक तिकीट प्रणाली, एकसमान नियम आणि प्रशिक्षित कर्मचारी मिळणार आहेत. सर्व ऑनबोर्ड कर्मचारी गणवेशात असतील.
स्थानिक चवीचा आस्वाद
या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी स्थानिक खाद्यपदार्थांची सोय करण्यात आली आहे. गुवाहाटीहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये आसामी जेवण, तर कोलकाताहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये बंगाली खाद्यपदार्थ दिले जातील. प्रवास रात्रीचा असल्याने रात्री जेवण आणि सकाळी चहा दिला जाणार आहे.
आराम आणि नियम
स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित या ट्रेनमध्ये अधिक कुशनिंग असलेले आरामदायक बर्थ, स्वयंचलित दरवाजे, सुलभ हालचालीसाठी व्हेस्टिब्यूल, सुधारित सस्पेन्शन आणि कमी आवाजाचा प्रवास अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे ही ट्रेन फक्त सामान्य प्रवाशांसाठी खुली असेल. यामध्ये कोणताही VIP किंवा आपत्कालीन कोटा नसेल. वरिष्ठ रेल्वे अधिकारीसुद्धा पासवर प्रवास करू शकणार नाहीत. फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाईल.
