लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि एक्झिट पोल मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला. एक्झिट पोलमुळे शेअर बाजारात लोकांचं 30 लाख कोटींचं नुकसान झालं, याची क्रोनोलॉजी समजून घ्या. पहिल्यांदा पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी स्टॉक मार्केटवर टिप्पणी केली. स्टॉक मार्केट जलद गतीने पुढे जाणार आहे, असं पंतप्रधान म्हणाले. गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनीही अशीच वक्तव्य केली, यामुळे बाजारात तेजी आली आणि नंतर बाजार बुडला. हा एक घोटाळा आहे. याची जेपीसीकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.
advertisement
'शेअर बाजारात भ्रम पसरवला गेला. पूर्ण प्रकरणाची जेपीसी चौकशी झाली पाहिजे. एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे. भारतातल्या शेअर बाजारातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली गेली पाहिजे' असं राहुल गांधी म्हणाले. याविरोधात कोर्टात जाणार का? असं विचारलं असता आम्ही जेपीसीची मागणी करत आहोत, असं उत्तर राहुल गांधींनी दिलं.
'निवडणुकीआधीही भाजपचे इंटरनल सर्व्हे त्यांना 220 जागा दाखवत होत्या. एक्झिट पोलनंतर एक भ्रम पसरवला गेला. यानंतर 3 जूनला शेअर बाजारने रेकॉर्ड तोडला आणि खूप उंचावर गेला. हा एक स्कॅम आहे, पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री यासाठी जबाबदार आहेत', असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.