एअर स्ट्राईक करण्याआधी ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला दिली होती, या जयशंकर यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांनी टीका केली आहे. त्यांनी याबाबत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांच्या टीकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून सारवासारव करत, एस जयशंकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी नक्की काय म्हणाले?
advertisement
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची व्हिडीओ क्लिप शेअर केली. त्यात राहुल गांधींनी म्हटले की, "आपल्याकडून हल्ला होणार असल्याची माहिती आधीच पाकिस्तानला देणं, हा गुन्हा होता. पण भारत सरकारने हे केलं. याची कबुली परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीरपणे दिली." यावेळी राहुल गांधी सरकारला दोन महत्त्वाचे प्रश्नही विचारले आहेत.
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला देण्याची परवानगी कुणी दिली? आणि यामुळे आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली? असे दोन सवाल राहुल गांधींनी विचारले. यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, आम्ही सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता. हा ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरचा सुरुवातीचा टप्पा होता. हल्ला करण्याआधी ही माहिती पाकला दिली होती. पण या वक्तव्याचा वापर चुकीच्या संदर्भाने केला जात आहे. वस्तुस्थिती पूर्णपणे चुकीची मांडली जात आहे."