नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी व्होट चोरी प्रकरणात नवा गौप्यस्फोट केला. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी व्होट चोरीला मदत केली असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारांची नावे त्यांना न कळवता डिलिट करण्यात आली. या प्रकरणातील आरोप करणाऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्त पाठीशी घालत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
advertisement
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी कशी व्होट चोरांना लोकशाहीविरोधातील लोकांना कशी मदत केलीय हे सांगणार आहे. मतचोरी कशी झाली, मते कशी बदलली हे पुराव्यानिशी मांडणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी व्होट चोरी करण्यासाठीची प्रक्रिया मोड्स ऑपरेडिंटी काय आहे, याचा पुराव्यासह दावा केला.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलं?
राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्होट चोरीच्या आरोपाचा पुनरुच्चार करताना केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी म्हटले की, कर्नाटकमधील आळंद मतदारसंघातून 6018 मतदारांची नावं वगळण्यात आली. मतदारांना कल्पनाच नाही की त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. दलित, अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदारयादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली. यात विशेषत: काँग्रेसच्या मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गोदाबाई या वयस्कर महिलेच्या नावावरून 12 मतदार वगळण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी गोदाबाई यांची व्हिडीओ क्लिप दाखवली.
कर्नाटक बाहेरील मोबाइल क्रमांकावरून मतदारांची नावे वगळण्यात आली. अर्ज कोणी केले, ओटीपी कोणाला गेले, हे सगळं संशयास्पद असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. सुर्यकांत नावाच्या व्यक्तीने 14 मिनिटांत 12 नावे वगळण्याचे अर्ज भरले असल्याचे आमच्या तपासात समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.
व्होट चोरीची मोड्स ऑपरेंडिटी काय?
राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट करताना व्होट चोरीची मोड्स ऑपरेंडिटी सांगितली. राहुल गांधी यांनी सांगितले की मागच्या पत्रकार परिषदेत आम्ही मतदारयादीतून कशाप्रकारे बोगस नावे जोडली जातात, हे दाखवलं. तर, या पत्रकार परिषदेत मतदारयादीतून कशी नावे वगळण्यात आली, याची माहिती देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसला ज्या बुथवर सर्वाधिक मते मिळाली, त्याच बुथवरील मतदारांना वगळण्यात आले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी सांगितले की, सूर्यकांत यांच्या नावावरून मतदारयादीतील 12 जणांची नावे वगळण्यात आली. अवघ्या काही मिनिटांत हे काम करण्यात आलं. तर, नागराज नावाच्या व्यक्तीने पहाटे 4 वाजता उठून 36 सेकंदात दोन नावे वगळण्यासाठी अर्ज केला. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत मतदारयादीतून नाव वगळलेल्या सूर्यकांत यांनी सांगितले की, माझ्या नावावरून १२ जणांची नावे वगळण्यात आली. मी कोणालाही मेसेज केला नाही, मी मतदारयादीतून नावं वगळण्याबाबत कोणताही अर्ज केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगावर गंभीर आरोप...
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. व्होट चोरीला निवडणूक आयोगाकडून मदत केली जात आहे. कर्नाटक सीआयडीने या मतदार वगळण्याचा तपास सुरू केला. सीआयडीने 18 अर्ज केले. आम्हाला ओटीपी ट्रेस, मोबाइल क्रमांक, कोणाच्या नावावर नंबर रजिस्टर आहे, अशी सगळी तांत्रिक माहिती मागितली. मात्र, निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद दिला गेला नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
मतदारयादीतून नावे वगळण्याच्या तक्रारीवर 23 फेब्रुवारी तपास सुरू झाला. मार्च महिन्यात काही पुरावे समोर आले. निवडणूक आयोगाला सीआयडीने पुढील काही दिवसात पत्र लिहिले.. ऑगस्टमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने अपूर्ण माहिती दिली, ज्याचा तपासात काहीच फायदा होणार नव्हता. सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला 18 वेळा स्मरण पत्रे पाठवली. त्यालाही उत्तर मिळाले नाही. कर्नाटक निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली, त्यांना उत्तर दिले नाही. ज्ञानेश्वर कुमार हे व्होट चोरीतील आरोपींना वाचवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.