कन्नूर : डोळ्यांत अश्रू आणि मनात अभिमान दाटवणारी एक घटना केरळच्या कन्नूर जिल्ह्यात घडली आहे. बारावीमध्ये शिकणारी 17 वर्षांची आयोना मॉनसन शाळेच्या इमारतीवरून पडून गंभीर जखमी झाली होती. उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र जाण्याआधी आयोनाने अनेकांना नवे आयुष्य देऊन अमरत्व मिळवले.
advertisement
पय्यावूर येथील शाळेत शिक्षण घेणारी आयोना प्रॅक्टिकल परीक्षेच्या तयारीत होती. सोमवारी सकाळी शाळेच्या इमारतीतून ती खाली कोसळली. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली. तातडीने तिला कन्नूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, कुटुंबीयांनी प्रार्थना केल्या; पण बुधवारी रात्री आयोनाने अखेरचा श्वास घेतला.
दु:खातून जन्मलेला धैर्याचा निर्णय
मुलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब कोलमडून गेले असताना आयोनाच्या पालकांनी एक अतिशय धैर्यशील आणि प्रेरणादायी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या लेकीचे अवयव दान करण्यास संमती दिली. ती आज आमच्यासोबत नसली, तरी तिच्या माध्यमातून इतरांना आयुष्य मिळत आहे, असे भावुक शब्द तिच्या पालकांनी सांगितले.
आयोनाचे डोळे, हृदय, किडनी आणि इतर अवयव अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले.
केरळमध्ये पहिलाच प्रसंग
केरळमध्ये प्रथमच अंतर्गत व्यावसायिक विमानसेवेचा वापर अवयव वाहतुकीसाठी करण्यात आला. आयोनाची एक किडनी घरगुती विमानाने तिरुवनंतपुरमला पाठवण्यात आली. विमानतळापासून तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजपर्यंत ‘ग्रीन कॉरिडोर’ तयार करण्यात आला, जेणेकरून प्रत्यारोपणात कोणताही विलंब होऊ नये.
तिचे हृदय खास चेन्नईला पाठवण्यात आले, जिथे एका गंभीर रुग्णाचे प्राण वाचले. इतर महत्त्वाचे अवयवही केरळमधील विविध ठिकाणी गरजू रुग्णांना देण्यात आले.
‘पय्यावूरची लेक’ म्हणून ओळख
शिक्षक आणि वर्गमित्रांच्या आठवणीत आयोना ही प्रेमळ, मेहनती आणि अत्यंत हुशार विद्यार्थिनी म्हणून कायम राहील. अभ्यासात पुढे असण्यासोबतच ती इतर उपक्रमांतही सक्रिय होती. तिच्या अचानक जाण्याने शाळेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
चर्चमध्ये अखेरचा निरोप
आयोनावर शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता तिरूर येथील सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी चर्च परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. आयोना आज भलेही आपल्यातून गेली असली, तरी तिच्या अवयवदानातून अनेकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य तिला कायम जिवंत ठेवेल.
