सातवीत शिकणाऱ्या मुलाच्या मोमोवरील प्रेमामुळे त्याच्या कुटुंबाला जवळपास 85 लाख रुपयांचे दागिने गमवावे लागले आहेत. साधीशी खाण्याची आवड कधी इतक्या मोठ्या फसवणुकीत बदलू शकते, याचा कुणालाही अंदाज नव्हता.
ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया शहरातील आहे. वाराणसीतील मंदिरात पुजारी असलेले विमलेश मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचा अल्पवयीन मुलगा मोमो खाण्याचा प्रचंड शौकीन आहे. याच सवयीचा गैरफायदा घेत स्थानिक मोमो स्टॉल चालवणाऱ्या तीन जणांनी त्याला हळूहळू जाळ्यात ओढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
advertisement
विमलेश मिश्रा यांचा दावा आहे की, मोमो विक्रेत्यांनी सुरुवातीला मुलाला “मोफत मोमो” देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी मुलाला सांगितले की, जर तो घरातून दागिने आणून दिले, तर त्याला कायम मोफत मोमो दिले जातील. बालसुलभ मनाने आणि मोहाला बळी पडून, त्या मुलाने घरातील कपाटातून हळूहळू सोन्याचे दागिने काढून ते तिन्ही मोमो विक्रेत्यांकडे दिले.
काही दिवसांपर्यंत ही बाब कुटुंबाच्या लक्षात आली नाही. मात्र एके दिवशी विमलेश मिश्रा यांच्या बहिणीने आपल्या दागिन्यांबाबत विचारणा केली. दागिने काढण्यासाठी कपाट उघडताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. कपाट पूर्णपणे रिकामे होते आणि घरातील सर्व मौल्यवान दागिने गायब झाले होते.
कुटुंबीयांनी मुलाला विचारणा केल्यानंतर सत्य समोर आले. मोमो खाण्यासाठी त्याने सर्व दागिने मोमो विक्रेत्यांना दिल्याची कबुली त्याने दिली. ही बाब समजताच कुटुंबीय हादरले.
यानंतर विमलेश मिश्रा यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी तिन्ही मोमो विक्रेत्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली असून, चोरी गेलेल्या दागिन्यांची सध्याची किंमत सुमारे 85 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, फसवणूक, आमिष दाखवून माल लंपास करणे आणि अल्पवयीन मुलाचा गैरवापर या गंभीर आरोपांखाली तपास सुरू आहे.
