बेंगळुरू: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा तालुक्यात लग्नावरून सुरू असलेल्या वादातून एका 35 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली.
advertisement
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव एस. निंगराजा असून, मृत वडील टी. सन्ननिंगप्पा आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. निंगराजाला त्याचा मोठा भाऊ एस. मारुती याने दिलेल्या तक्रारीनंतर ताब्यात घेण्यात आले.
तक्रारीनुसार, निंगराजा आपल्या वडिलांवर प्रचंड नाराज होता. वयाची 35 वर्षे उलटूनही आपले लग्न का लावून दिले नाही, याचा त्याला राग होता. गावातील त्याच वयाचे अनेक तरुण लग्न करून मुलांचे वडील झाले असताना, आपण अजूनही अविवाहित आहोत, याची खंत तो वारंवार व्यक्त करत असे. त्यातच वडिलांनी दोनदा लग्न केले, तर आपले लग्न झाले नाही, ही गोष्ट त्याच्या मनात खोलवर रुतून बसली होती.
मारुतीने पोलिसांना सांगितले की, वडील अनेकदा निंगराजाला आळशी आणि शेतीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सुनावत असत. यामुळे घरात वारंवार वाद होत आणि तणाव वाढत गेला.
बुधवारी सायंकाळी जेवणाच्या वेळी पुन्हा एकदा याच विषयावर वडील-लेकांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी निंगराजाने वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर रात्री उशिरा वडील झोपेत असताना निंगराजाने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार केल्याचा आरोप आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास एका नातेवाइकाने मारुतीला फोन करून घटनेची माहिती दिली. गंभीर जखमी अवस्थेत सन्ननिंगप्पा यांना होसदुर्गा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. नेमकी घटना कशी घडली, याचा क्रम आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत.
दरम्यान अशाच एका अन्य घटनेत उत्तर प्रदेशात जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने आपल्या वडील, बहिण आणि भाचीची कुऱ्हाडीने हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याचा प्रकार अलीकडेच समोर आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
