बल्लारी : महाराष्ट्रात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुमाकुळ सुरू आहे. एका बाजूला राज्यात राजकीय वातावरण तापले असताना दुसऱ्या बाजूला एक मोठी राजकीय घडामोडने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे. निवडणुका म्हटल्यावर बॅनर बाजी आलीच. पण निवडणुकांशिवाय देखील बॅनरबाजी होत असते. असेच एक बॅनर लावण्यावरून झालेल्या गोळीबारात काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
advertisement
कर्नाटकातील बल्लारी शहरातील हवंबावी परिसरात गुरुवारी उशिरा रात्री दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या तणावातून दगडफेक झाली. त्यानंतर झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबारात काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता ठार झाला आहे. मृत कार्यकर्त्याचे नाव राजशेखर असून तो शहरातील आमदार नारा भारत रेड्डी यांचा समर्थक होता. ही घटना हवंबावी परिसरात असलेल्या गंगावतीचे आमदार गली जनार्दन रेड्डी यांच्या निवासस्थानासमोर घडली.
3 जानेवारी रोजी होणाऱ्या वाल्मिकी पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरभर बॅनर लावण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान, गली जनार्दन रेड्डी यांच्या घराजवळ बॅनर लावण्याच्या मुद्द्यावरून भारत रेड्डी आणि जनार्दन रेड्डी यांच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद काही वेळातच हाताबाहेर गेला आणि दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक सुरू झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान आपल्या मतदारसंघातून परत येत असताना गली जनार्दन रेड्डी यांना भारत रेड्डी यांच्या समर्थकांनी वेढा घातला, अशी माहिती समोर आली आहे. परिसरात एकच गोंधळ उडाला असताना, भारत रेड्डी यांच्या काही समर्थकांकडून चार गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात काँग्रेस कार्यकर्ता राजशेखर याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर गली जनार्दन रेड्डी यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “मी मतदारसंघात गेलो असताना भारत रेड्डी यांच्या समर्थकांनी माझ्या घरासमोर खुर्च्या ठेवून गोंधळ घातला. मी परत आलो तेव्हा भारत रेड्डी यांचे समर्थक सतीश रेड्डी यांच्या अंगरक्षकांनी 4 ते 5 राऊंड गोळीबार केला. हा माझ्यावर केलेला थेट हत्येचा प्रयत्न होता.”
एका गोळीचे रिकामे खोके दाखवत गली जनार्दन रेड्डी यांनी भारत रेड्डी यांनीच मला ठार मारण्याचा कट रचला, असा थेट आरोप केला आहे.
मात्र या आरोपांना प्रत्युत्तर देताना आमदार भारत रेड्डी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “गली जनार्दन रेड्डी स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप करत आहेत,” असे भारत रेड्डी यांनी सांगितले.
या गंभीर घटनेनंतर शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारीच पदभार स्वीकारलेले नवे पोलीस अधीक्षक पवन नेज्जूर हे स्वतः घटनास्थळी तळ ठोकून असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
