नेमकी घटना काय?
ही घटना राजस्थानच्या कोटा इथे बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. रहिवासी सुभाष कुमार रावत हे ३ जानेवारी रोजी आपल्या पत्नीसह खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून दोन चोरांनी तिथे डल्ला मारण्याचा कट रचला. घराचे कुलूप तोडण्याऐवजी त्यांनी किचनच्या एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या जागेतून आत शिरण्याचे ठरवले.
advertisement
...अन् चोर तिथेच अडकला!
एक्झॉस्ट फॅनच्या अरुंद छिद्रातून आत शिरताना एका चोराचा अंदाज चुकला आणि तो त्या छिद्रातच अडकून पडला. कितीही जोर लावला तरी काही केल्या बाहेरही जाता येईना आणि येतही येता येईना अशी त्याची स्थिती झाली. ४ जानेवारीच्या रात्री जेव्हा घरमालक सुभाष कुमार परतले, तेव्हा त्यांना किचनच्या खिडकीत एक माणूस लटकलेला दिसला. हा प्रकार पाहून त्यांनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक लोक जमा झाले तेव्हा त्यांना दिसले की, चोर त्या छित्रात अडकून मदतीसाठी धडपडत आहे. जमावाला पाहून बाहेर उभा असलेला त्याचा साथीदार मात्र तिथून पसार झाला.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कारवर पोलिसांचा स्टिकर
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ खटाटोप केल्यानंतर त्या चोराला सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, हे चोर ज्या कारने आले होते, त्या कारवर पोलिसांचा स्टिकर लावलेला होता. पोलिसांनी ती कार जप्त केली असून पळून गेलेल्या दुसऱ्या चोराचा शोध घेतला जात आहे.
