कोलकाता/नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सोमवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रुग्ण उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासत येथील बारासत रुग्णालयात ओळखले गेले आहेत.
advertisement
घटनेची माहिती मिळताच राज्य सरकारची एक टीम सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. निपाह हा प्राण्यांकडून माणसात पसरणारा (झुनॉटिक) आणि उच्च मृत्युदर असलेला संसर्गजन्य आजार असल्याने प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
केंद्र-राज्य समन्वय, तातडीची पावले
प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिवांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिव आणि आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. वेगवान आणि समन्वयित प्रतिसादासाठी आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या.
राज्य सरकारला मदत करण्यासाठी राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक (National Joint Outbreak Response Team) तैनात करण्यात आले आहे. या पथकात कोलकात्याच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड पब्लिक हायजीन, एनआयव्ही पुणे, एनआयई चेन्नई, एम्स कल्याणी, तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयातील वन्यजीव विभाग येथील तज्ज्ञांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने निपाह विषाणूबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्याच्या इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम (IDSP) युनिटला पाठवल्या आहेत. याशिवाय, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), दिल्ली येथील पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटर (PHEOC) सक्रिय करून राष्ट्रीय स्तरावर समन्वय साधला जात आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून केंद्राकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. नड्डा यांनी दूरध्वनीवरूनही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत, आवश्यक सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून तांत्रिक, लॉजिस्टिक आणि कार्यान्वयनात्मक मदत देण्यात येत असून, प्रयोगशाळा सुविधा, वाढीव निगराणी, रुग्ण व्यवस्थापन, संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण उपाय आणि तज्ज्ञ मार्गदर्शन आधीच सक्रिय करण्यात आले आहे.
राज्य सरकारला तज्ज्ञ पथकांशी सतत समन्वय ठेवण्याचा, संपर्क शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय काटेकोरपणे राबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांसाठी हेल्पलाईन: जनतेसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले असून, 033-2333-0180 आणि 98747-08858 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
