नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हमासचे राजकीय प्रमुख इस्माईल हानियेह यांची तेहरानमध्ये हत्या होण्याच्या काही तास आधी त्यांची प्रत्यक्ष भेट कशी झाली होती, याचा अनुभव सांगितले. इराणची राजधानी तेहरानमधील या घटनेचा अनुभव सांगताना त्यांनी आधुनिक युद्धपद्धती, राष्ट्रीय सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या वाढता प्रभाव यावर देखील भाष्य केले.
advertisement
एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या शपथविधी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विनंतीवरून मी इराणला गेले होतो. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला पाठवण्यात आले होते. या शपथविधीपूर्वी विविध देशांचे मान्यवर तेहरानमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते.
मोदींनी पाठवले अन् हमास प्रमुखाची भेट
“मी इराणच्या पंतप्रधानांच्या (राष्ट्राध्यक्षांच्या) शपथविधीसाठी गेलो होतो. तिथे एक पंचतारांकित हॉटेल आहे, जिथे सर्व राष्ट्रप्रमुख थांबले होते. मोदीजींनी मला तिथे पाठवले होते,” असे गडकरी यांनी सांगितले. त्या वेळी माझे लक्ष एका अशा व्यक्तीकडे गेले, जो राष्ट्रप्रमुख नव्हता. मला प्रश्न पडला की हा कोण आहे. मी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि विचारले तर तो हमासचा प्रमुख होता. हानियेह इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि मुख्य न्यायाधीश यांच्यासोबत समारंभात प्रवेश करत होता, तर इतर प्रतिनिधी त्यांच्या मागे होते.
पहाटे अचानक उठवण्यात आले
“मी हॉटेलमध्ये परत आलो, जेवण केले आणि झोपलो. पहाटे चार वाजता राजदूतांनी दरवाजा ठोठावला आणि म्हणाले, ‘सर, आपल्याला तात्काळ स्थलांतर करावे लागेल.’ मी विचारले, का? त्यांनी सांगितले की मोठी समस्या निर्माण झाली आहे. मी विचारले काय झाले? तर त्यांनी सांगितले की काल इथे आलेले, एक अत्यंत शक्तिशाली हमासचे नेते, त्यांच्या खोलीत मारले गेले,”
इराणी अधिकाऱ्यांनी नंतर अधिकृतपणे स्पष्ट केले की, 31 जुलै 2024 रोजी पहाटे सुमारे 1.15 वाजता इस्माईल हानियेह यांची हत्या करण्यात आली. ते इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या देखरेखीखालील एका अत्यंत सुरक्षित लष्करी संकुलात वास्तव्यास होते. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या हल्ल्यात हानियेह यांचा अंगरक्षकही ठार झाला.
गडकरी यांनी सांगितले की, हत्येची अचूक पद्धत अद्याप स्पष्ट नाही. मात्र त्यांनी यावरून भविष्यात तंत्रज्ञानाचे महत्त्व किती निर्णायक ठरणार आहे, याकडे लक्ष वेधले. त्या दिवशी (हानियेह यांच्या हत्येचा दिवस) कोणालाही माहीत नाही की क्षेपणास्त्र कुठून डागले गेले, ते कसे आत शिरले. काही जण म्हणतात की, त्याचा मोबाईल फोन नंबर ट्रॅक करण्यात आला. तो एका बंगल्यात खास लपवून ठेवण्यात आला होता आणि थेट त्या खोलीत जाऊन त्याला ठार मारण्यात आले. त्यामुळे येणारा काळ हा पूर्णपणे भविष्यवेधी आहे. तंत्रज्ञान आणि भविष्याचा दृष्टिकोनातून आपल्याला संरक्षण, शेती, उद्योग, व्यापार, व्यवसाय, निर्यात अशा सर्व क्षेत्रांत काम करावे लागेल.
शक्तिशाली देशांना टार्गेट करणे अवघड
याच कार्यक्रमात गडकरी यांनी असेही नमूद केले की, जे देश शक्तिशाली असतात, त्यांना टार्गेट करणे अवघड असते. त्यांनी इस्रायलचे उदाहरण देत सांगितले की, तंत्रज्ञान आणि लष्करी ताकद कशी जागतिक प्रभाव निर्माण करते, हे इस्रायल दाखवून देतो.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने सांगितले होते की, हानियेह ज्या इमारतीत थांबले होते, त्यावर कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. दरम्यान द टेलिग्राफ या वृत्तपत्राने इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असा दावा केला आहे की, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने अतिथीगृहात स्फोटके लावून ही हत्या घडवून आणली असावी. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी या दाव्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
