लखनऊ, 14 ऑगस्ट : आपल्या आई-वडिलांना मेहनत करताना पाहून आपण खूप शिकायचं आणि त्यांना सुखाचं आयुष्य द्यायचं, असा विचार करणारी काही धाडसी मुलं असतात. कितीही अडचणी आल्या तरी ते शिक्षण सोडत नाहीत, यश मिळेपर्यंत मेहनत करत राहतात. मात्र हे शिक्षण केवळ पुस्तकी असतं असं नाही हा, तर अनेक मुलांमध्ये उपजतच काही कलागुण दडलेले असतात. नेमके हेच गुण अचूक ओळखून मुलं त्यांवर मेहनत घ्यायला सुरुवात करतात आणि कलाक्षेत्रात नाव कमवतात. ही बातमीदेखील अशाच तीन भावंडांची आहे.
advertisement
उत्तर प्रदेशच्या लखनऊ भागातल्या एकाच कुटुंबातील तीन विद्यार्थ्यांची नावाजलेल्या क्रीडा महाविद्यालयांमध्ये निवड झाली आहे. आता हे शालेय विद्यार्थी या महाविद्यालयांकडून हॉकी खेळतील आणि प्रशिक्षणही घेतील. विशेष म्हणजे हालाखीच्या परिस्थितीत आई-वडिलांनी हॉकी खेळण्यास प्रोत्साहन दिलं, म्हणून आता आपणही त्यांना सुखाचं आयुष्य द्यायचं, असं या तीनही मुलांचं स्वप्न आहे. सौमिका धानुका (वय - 13 वर्षे), ऋतिक धानुका (वय - 10 वर्षे) आणि करण धानुका (वय - 12 वर्षे) अशी या मुलांची नावं आहेत. त्यांचे वडील गाड्यांच्या टायरचं काम करतात. तर, आईचं चिप्स आणि कोल्डड्रिंकचं दुकान आहे. ते सर्वजण एकाच खोलीच्या घरात राहतात. मात्र घर लहान असलं तरी तीन मुलांच्या मेडल्स आणि ट्रॉफीने ते प्रचंड शोभून दिसतं.
ड्रायव्हरच्या लेकाला 2 कोटींची स्कॉलरशीप; सरकारी शाळेत शिकला, आता UK मध्ये घेणार PhD
तीन मुलांपैकी मोठी मुलगी सौमिका धानुका ही मुलगी असल्यामुळे तिच्या हॉकी खेळण्यावरून नातेवाईकांनी त्यांच्या आई-वडिलांना खूप टोमणे दिले. मुलगी आहे, तिला घरात बसवा, शाळेतही पाठवू नका, लवकरच लग्न लावून द्या, असं लोक म्हणायचे. मात्र आई-वडिलांनी लोकांचं ऐकलं नाही, तर मोठ्या जिद्दीने तिची शाळा सुरू ठेवली. ती मुलींच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकतेय. आता केडी सिंह बाबू स्टेडियममध्ये तिची निवड झाली आहे. 20 ऑगस्टपासून ती येथील वसतीगृहात राहू लागेल. तर, सौमिकाचा भाऊ ऋतिक याची लखनऊच्या कुर्सी रोडवरील गुरू गोविंद सिंह स्पोर्ट कॉलेजमध्ये निवड झाली आहे. भारतीय हॉकी टीममध्ये सामील व्हायचं असं या बहीण-भावाचं स्वप्न आहे. तर, त्यांचा लहान भाऊ करण याची झाँसीच्या मेजर ध्यान चंद स्पोर्ट्स अकादमीमध्ये निवड झाली असून तो तेथील वसतीगृहात राहू लागला आहे.
'या' रस्त्यावरून जायचं असेल तर कपडे काढणं अनिवार्य, कारण आहे किळसवाणं
मुलांची आई सीमा आणि वडील भोला कुमार यांनी तिन्ही मुलांबाबत प्रचंड अभिमान व्यक्त केला. वडील म्हणाले, 'मी लोकांच्या गाड्यांच्या टायरचे पंक्चर काढून मुलांना शिकवलं आणि हॉकी खेळायला पाठवलं. आम्ही रस्त्यावर गरिबीत आयुष्य काढलं, मात्र मुलांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, केवळ मुलांच्या आनंदाकडे लक्ष दिलं.' तर, आईने म्हटलं, 'दुकानातून मिळणारे सर्व पैसे मुलांच्या शिक्षणावर आणि हॉकीवर खर्च केले. सर्वच आई-वडील स्वतःच्या गरजांवर कमी आणि मुलांवर अधिक लक्ष देतात, आम्हीसुद्धा तेच केलं. आता एकाच खोलीत जगणं फार अवघड झालंय. कदाचित भविष्यात या गरिबीपासून सुटका होईल', अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली.