ड्रायव्हरच्या लेकाला 2 कोटींची स्कॉलरशीप; सरकारी शाळेत शिकला, आता UK मध्ये घेणार PhD
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
फार अडचणी आल्या पण त्याने अभ्यास थांबवला नाही. शिक्षणाच्या जोरावरच आपली परिस्थिती बदलायची हे ध्येय त्याने उराशी बाळगलं होतं.
सुमित भारद्वाज, प्रतिनिधी
पानिपत, 14 ऑगस्ट : यशाला मेहनतीशिवाय पर्याय नसतो, हेच सत्य जाणून अनेक ध्येयप्रेमी जीवापाड मेहनत करतात. मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मोठ्या आत्मविश्वासाने मात करून यश मिळवतात. दीपक भारद्वाजदेखील त्यापैकीच एक. जगातल्या एका मोठ्या विद्यापीठाकडून पीएचडीसाठी त्याची निवड झाली आहे. शिवाय त्याला शिष्यवृत्तीदेखील या विद्यापीठाकडूनच देण्यात येणार आहे.
हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील महराणा गावचा रहिवासी असलेल्या दीपकच्या घरची परिस्थिती पूर्वीपासूनच बेताची होती. वडिलांनी ड्रायव्हरची नोकरी करून त्याला शिकवलं. परिस्थितीचं भान ठेवून तोदेखील मन लावून शिकला. इयत्ता बारावीपर्यंतचं शिक्षण त्याने गावातल्याच सरकारी शाळेतून पूर्ण केलं. फार अडचणी आल्या पण त्याने अभ्यास थांबवला नाही. शिक्षणाच्या जोरावरच आपली परिस्थिती बदलायची हे ध्येय त्याने उराशी बाळगलं होतं. आता त्याच्या कष्टाला फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. युनायटेड किंगडमच्या ब्रिस्टल विद्यापीठाकडून पीएचडीसाठी त्याची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या शिक्षणासाठी त्याला कमीत कमी 2 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवलं आहे.
advertisement
बारावी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर NIT हमीरपूरमध्ये दीपकची निवड झाली होती. 2021 साली पदव्युत्तर पदवी (एमएससी) पूर्ण करून त्याने आयआयटी गुवाहाटीमध्ये एका प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान त्याचे ब्रिस्टल विद्यापीठात प्रवेश मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याच्या चिकाटीची दखल या विद्यापीठानेही घेतली आणि पीएचडीसाठी त्याची निवड झाली. त्याला विज्ञान क्षेत्रात संशोधन करायचं आहे.
advertisement
या यशाबद्दल दीपकने आई-वडिलांसह आपल्या सर्व शिक्षकांचे आभार मानले. तो म्हणाला, 'मनात तीव्र इच्छा असली की व्यक्ती कोणतंही ध्येय गाठू शकते.' तर, 'दीपकने आमच्यासह संपूर्ण जिल्ह्याचं नाव रोशन केलं आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे', अशा भावना त्याच्या आईने व्यक्त केल्या.
Location :
Panipat,Haryana
First Published :
August 14, 2023 11:51 AM IST
मराठी बातम्या/देश/
ड्रायव्हरच्या लेकाला 2 कोटींची स्कॉलरशीप; सरकारी शाळेत शिकला, आता UK मध्ये घेणार PhD