समोर आलेल्या क्लिप्सपैकी एका व्हिडिओत ते पोलीस गणवेशात कार्यालयात बसून त्या महिलेला किस करताना दिसतात. दुसऱ्या व्हिडिओत ते सूटमध्ये, आपल्या चेंबरमध्ये भारतीय ध्वज आणि पोलीस विभागाचे चिन्ह मागे असताना, अशाच प्रकारचं वर्तन करताना दिसत असल्याचा आरोप आहे.
व्हिडिओ जुने असल्याचा दावा
IANS वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हे व्हिडिओ एक वर्षाहून अधिक जुने असून, ते रान्या रावच्या अटकेपूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित दृश्ये कार्यालयात बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यांतून रेकॉर्ड झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.
advertisement
गृह मंत्र्यांची तातडीची भेट
व्हिडिओ पसरल्यानंतर रामचंद्र राव यांनी तातडीने गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचा दावा केला. “मी धक्क्यात आहे. हे व्हिडिओ खोटे आणि मुद्दाम तयार करण्यात आलेले आहेत. या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असून लवकरच वकिलांचा सल्ला घेऊन तक्रार दाखल करेन,” अशी प्रतिक्रिया रामचंद्र राव यांनी दिली.
व्हिडिओ कार्यालयातच शूट झाला का?
पत्रकारांनी व्हिडिओ त्यांच्या कार्यालयातच शूट झाला का, असा सवाल केल्यावर रामचंद्र राव यांनी आपण आठ वर्षांपूर्वी बेळगावीत कार्यरत होतो, असं सांगितलं. मात्र, बेळगावीतील त्यांच्या कार्यकाळाचा आणि सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा नेमका संबंध काय, याबाबत त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडियोची सत्यता न्यूज 18 मराठीतने तपासलेली नाही.
47 सेकंदांचा व्हिडिओ
सोशळ मीडियावर व्हायरल होणारा 47 सेकंदांचा व्हिडिओ मोबाईल फोनने त्यांच्या चेंबरमध्ये शूट करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ अनेक क्लिप्स जोडून तयार करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. ही कथित घटना कर्तव्यावर असताना, सरकारी कार्यालयातच घडल्याचा आरोप असल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनलं आहे आणि पोलिस खात्याची मोठी नामुष्की झाल्याचं बोललं जात आहे.
रान्या राव प्रकरणाची पार्श्वभूमी
1993 बॅचचे IPS अधिकारी असलेले रामचंद्र राव यांचं नाव याआधीही चर्चेत आलं होतं. 2025 मध्ये त्यांची सावत्र मुलगी, अभिनेत्री रान्या राव, हिला सोन्याच्या बेकायदेशीर तस्करीप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अटक केली होती. सध्या ती बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये आहे.
रान्या रावच्या अटकेनंतर, रामचंद्र राव यांनी या तस्करीत मदत केली का, याचा तपास सुरू करण्यात आला होता. त्या काळात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. मात्र चौकशीत त्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांची पुन्हा DGP (DCRE) म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि त्यामागची पार्श्वभूमी याबाबत अधिकृत तपास होतो का, याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
