नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या एनडीएच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी शिवसेनेचा उल्लेख केला आहे. ठाकरेंनी आपल्याशी असलेली युती तोडली, आम्ही युती तोडली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांना म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढच नाही मोदींनी खासदारांना देशातल्या एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा दाखलाही दिला.
advertisement
यापुढेही एनडीए म्हणून काम करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांना दिलं आहे. तसंच काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे सत्तेतून पायउतार व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
राज्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक घेतली. या बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआयचे खासदार उपस्थित होते. महाराष्ट्रातून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य बैठकीला उपस्थित होते. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीच्या निमित्ताने एनडीएने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या खांद्यावर होती. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक नवी दिल्लीमध्ये बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.