सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागली?
गुजरातचे भावेश शाह हे पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर. 2018 मध्ये एका चांगल्या नोकरीच्या निमित्ताने ते बायको धरासोबत जर्मनीला स्थायिक झाले. 2021 मध्ये त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या 'अरिहा'चे आगमन झाले. बर्लिनमधील त्या छोट्याशा घरात आनंदाचे वातावरण होते. पण सप्टेंबर 2021 मध्ये एका दुर्दैवी घटनेने सर्व काही उद्ध्वस्त केले. खेळता खेळता अरिहाला दुखापत झाली आणि जेव्हा पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले, तेव्हा त्यांच्यावरच संशयाची सुई रोखली गेली.
advertisement
रुग्णालयातील डॉक्टरांनी अरिहाच्या दुखापतीकडे 'लैंगिक शोषणाच्या' संशयातून पाहिले. जर्मनीची 'यूगेंडम्ट' (चाइल्ड प्रोटेक्शन एजन्सी) तातडीने सक्रिय झाली आणि अवघ्या 7 महिन्यांच्या अरिहाला तिच्या आई-वडिलांपासून खेचून नेण्यात आले. तपास झाला, वैद्यकीय चाचण्या झाल्या आणि धक्कादायक म्हणजे पोलिसांनी मान्य केले की कोणताही अत्याचार झाला नव्हता. पण, खरी शोकांतिका इथूनच सुरू झाली.
यौन शोषणाचे आरोप फेटाळले गेल्यानंतरही जर्मनीच्या यंत्रणेने अरिहाला पालकांकडे सोपवण्यास नकार दिला. त्यांनी नवीन आरोप केला की, पालक निष्काळजी आहेत. त्यामुळे अरिहाला दुखापत झाली. या तांत्रिक मुद्द्यावर जर्मनीच्या न्यायालयाने आई-वडिलांचे हक्क नाकारले आणि अरिहाला 'फोस्टर केअर'मध्ये (पालक केंद्र) पाठवले. आज अरिहा जवळपास 5 वर्षांची होत आली आहे. ती जर्मन भाषा बोलतेय, तिथेच मोठी होतेय, पण आपल्या खऱ्या आईच्या स्पर्शासाठी आणि आपल्या भारतीय मुळांसाठी ती पोरकी झाली आहे.
अरिहाचे आई-वडील जैन धर्माचे पालन करणारे आहेत. धरा शाह यांचा सर्वात मोठा टाहो हा आहे की, त्यांच्या शाकाहारी आणि धार्मिक संस्कारांच्या विरुद्ध अरिहाला तिथे मांसाहारी आहार दिला जात आहे. एका भारतीय मुलीची ओळख, तिची भाषा आणि तिची संस्कृती परदेशात पुसली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
हा लढा आता केवळ एका कुटुंबाचा उरलेला नाही. संसदेत जया बच्चन यांच्यासह अनेक महिला खासदारांनी अरिहाच्या आईला पाठिंबा दिला आहे. प्रकरण इतके गंभीर बनले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज़ यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय अरिहाला मायदेशी परत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. एकीकडे जर्मनीचे कडक कायदे आणि दुसरीकडे एका भारतीय आईची आर्त हाक; या लढाईत अरिहा कधी आपल्या मातीशी आणि आपल्या आईशी पुन्हा जोडली जाईल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
