श्रद्धा, भक्ती आणि विज्ञानाच्या या युगात एका बाजूला गंगेच्या तीरावर लाखो भाविक श्रद्धेची डुबकी मारत असताना, दुसरीकडे एका 'लक्झरी' एन्ट्रीने सोशल मीडियावर चर्चेचा पूर आणला आहे. ही चर्चा आहे 'सतुआ बाबा' यांची आणि त्यांच्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्यांची.
प्रयागराजच्या पवित्र माघ मेळ्यात सध्या एका स्पोर्ट्स कारची जबरदस्त चर्चा आहे. ही कार साधीसुधी नसून ती आहे 'पोर्श टर्बो 911' (Porsche Turbo 911), जिची किंमत तब्बल 4.4 कोटी रुपये सांगितली जात आहे. वाराणसीच्या सतुआ बाबा पीठाचे प्रमुख संतोष दास, जे 'सतुआ बाबा' म्हणून ओळखले जातात, ते स्वतः ही गाडी चालवत मेळ्यात पोहोचले.
advertisement
याआधीही ते जवळपास 3 कोटी रुपयांच्या 'लँड रोव्हर डिफेंडर' मधून फिरताना दिसले होते. त्यांच्या छावणीबाहेर उभ्या असलेल्या या महागड्या गाड्या पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. एका बाजूला साधी राहणी आणि दुसरीकडे कोट्यवधींच्या गाड्या, हा विरोधाभास सध्या वादाचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.
कोण आहेत हे 'सतुआ बाबा'?
मूळ नाव: संतोष तिवारी.
जन्मस्थान: ललितपूर जिल्हा, उत्तर प्रदेश.
प्रवास: वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि संन्यासाचा मार्ग स्वीकारला.
पद: सध्या ते वाराणसीतील विष्णू स्वामी संप्रदायाचे नेतृत्व करतात. 2012 मध्ये त्यांची या संप्रदायाचे 57 वे आचार्य म्हणून नियुक्ती झाली.
उपाधी: 2025 च्या महाकुंभ दरम्यान त्यांना 'जगद्गुरु' ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
जेव्हा सतुआ बाबांना त्यांच्या या महागड्या जीवनशैलीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर तितकंच विचार करायला लावणारं होतं. त्यांनी स्पष्ट केलं की, लोकांनी वाहनाकडे न पाहता प्रवासाच्या उद्देशाकडे लक्ष दिलं पाहिजे.
"हा केवळ माघ मेळा नाही, तर संपूर्ण भारताची चर्चा आज जागतिक स्तरावर होत आहे. हा रामाचा, श्रद्धेचा आणि विकासाचा भारत आहे. अध्यात्मावर विश्वास ठेवणारे लोक अशा गाड्यांमधून का फिरू शकत नाहीत? ही सनातन धर्माची ताकद आहे," असं त्यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितलं. तसंच, त्यांनी एका मुलाखतीत नमूद केलं की, अशी उच्च दर्जाची साधनं ही 'योग्यांसाठी' असतात, 'भोग्यांसाठी' नाहीत. त्यांच्या मते, आधुनिक संसाधने आणि आध्यात्मिक सराव हे हातात हात घालून चालू शकतात.
विरोधाभास की आधुनिक अध्यात्म?
सतुआ बाबांच्या छावणीत गेल्यास ते अगदी साध्या वेशात दिसतात. पण बाहेर निघताना त्यांच्या डोळ्यावर ब्रँडेड गॉगल आणि हातात स्पोर्ट्स कारचे स्टेअरिंग असते. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ते कधी उंटावरून, कधी ट्रॅक्टरवरून तर कधी बैलगाडीतून प्रवास करताना दिसतात.
या प्रकारामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहींच्या मते, संन्यासाचा अर्थ त्याग असतो आणि अशा प्रकारे संपत्तीचे प्रदर्शन करणे धर्माला शोभत नाही. तर दुसरीकडे, अनेकांचे म्हणणे आहे की बदलत्या काळानुसार साधूंनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात काहीच गैर नाही.
या वादाच्या आणि चर्चेच्या पलीकडे प्रयागराजमध्ये भक्तीचा ओघ सुरूच आहे. एकादशीच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी गंगेत स्नान केले. आता सर्वांचे लक्ष 15 जानेवारीला होणाऱ्या मकर संक्रांतीच्या दुसऱ्या मोठ्या 'शाही स्नाना'कडे लागले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत सतुआ बाबांनी या मेळ्याच्या नियोजनालाही दाद दिली आहे.
शेवटी प्रश्न हाच उरतो की, अध्यात्म म्हणजे केवळ त्याग की आधुनिक जगाशी जुळवून घेत केलेली ईश्वराची भक्ती? याचे उत्तर प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार वेगवेगळे असू शकते.
