हिंगणा येथे राहणारे हर्षल शेंडे हे सर्पमित्र म्हणून ओळखले जातात. त्यांना एका घरात साप असल्याची माहिती मिळाली. लगेच ते त्या ठिकाणी पोहोचले. तिथे त्यांना आढळले की एक साप एका ड्रमखाली अडकून पडला होता. हर्षल शेंडे यांनी सापाला बाहेर काढले.पण, त्यांना दिसले की साप अजिबात हलचाल करत नव्हता. सापाची अवस्था खूपच गंभीर होती. त्याला तात्काळ वैद्यकीय मदतीची म्हणजेच सीपीआरची गरज होती हे त्यांनी लगेच ओळखले.
advertisement
सर्पमित्राने दाखवले धाडस
साप अतिशय खराब अवस्थेत होता. हर्षल यांनी लगेच त्याला थोडे पाणी पाजले. पाणी पिताच तो साप थोडासा शुद्धीवर आला. यानंतर हर्षल यांनी जे केले ते पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे लोक आश्चर्यचकित झाले.
हर्षल यांनी एका पाईपचा वापर करून सापाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यांनी पाईपचा एक टोक सापाच्या तोंडात घातले. सापाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळावा म्हणून त्यांनी हे टोक कापसाच्या साहाय्याने व्यवस्थित बंद केले. त्यानंतर पाईपचे दुसरे टोक स्वतःच्या तोंडाने पकडून त्यांनी सापाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यास म्हणजेच सीपीआर देण्यास सुरुवात केली. हे दृश्य खरोखरच अविश्वसनीय होते.
सापाला मिळाले नवजीवन
काही वेळा सीपीआर दिल्यानंतर सापाच्या शरीरात थोडी हलचाल जाणवू लागली. त्यानंतर काहीच मिनिटांत तो साप पूर्णपणे होशमध्ये आला आणि पूर्ववत सक्रिय झाला. हर्षल शेंडे यांनी स्पष्ट केले की हा साप विषारी नाही. त्यांनी सापाची संपूर्ण तपासणी केली आणि तो पूर्णपणे निरोगी असल्याची खात्री केली. त्यानंतर, त्यांनी त्या सापाला सुरक्षितपणे जंगलात नेऊन सोडले.