कोंडीत वाहनांचे इंजिन सतत चालू ठेवावे लागल्याने इंधनाचा मोठा अपव्यय होतो. अंदाजानुसार, सात ते आठ लाख वाहने दररोज या मार्गावर धावतात त्यातील सुमारे अर्धी कोंडीत अडकतात. प्रत्येक वाहन सरासरी 30 मिनिटे इंजिन चालू ठेवते, ज्यात 0.5 ते 1 लिटर इंधन वाया जाते. त्यामुळे दररोज 30 ते 40 हजार लिटर पेट्रोल-डिझेल जळते.
advertisement
या अपव्ययाचा आर्थिक परिणाम प्रचंड आहे. इंधनाचा थेट खर्च 2200 ते 2900 कोटी रुपये, वाहनांच्या जादा देखभालीचा 500 ते 800 कोटी, उत्पादनक्षम वेळेच्या नुकसानीचा 1,095 कोटी, पुरवठा साखळीतील अडचणींचा 1200 ते 1500 कोटी, तर आरोग्यविषयक खर्च 200 ते 300 कोटी इतका होत असल्याचे अंदाज आहे.
वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणाची पातळीही झपाट्याने वाढत आहे. शहापूर व कसारा परिसरात पीएम 2.5 आणि पीएम 10 या प्रदूषणकणांचे प्रमाण मानक मर्यादेपेक्षा जवळपास दुप्पट झाले आहे. रहिवासी सांगतात की, सकाळी खिडकी उघडली तरी डिझेलचा वास येतो आणि मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो.
वाहनचालक आणि प्रवासी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण आणि सुधारणा करण्याची आश्वासने वर्षानुवर्षे दिली जात असली तरी प्रत्यक्षात कामे कासवगतीने सुरू आहेत. नागरिकांचा प्रश्न एकच घोषणांपेक्षा कृती कधी होणार?.
