सहा महिन्यांनंतर उलगडला घरातील चोरीचा प्रकार
दादर (पूर्व)येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेने आपल्या आईला तिच्या वडिलांकडून मिळालेल्या सोन्याच्या भेटवस्तू घरातील लॉकरमध्ये ठेवलेल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी लॉकरची चावी हरवल्यामुळे त्यांनी लॉकर उघडले नव्हते. जवळपास सहा महिने लॉकर बंदच होता. मात्र 3 जानेवारी रोजी चावी बनविणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने लॉकर उघडण्यात आले.
लॉकर उघडताच धक्कादायक प्रकार समोर आला. लॉकरमधील सुमारे 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच एकूण 11 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे घरात फक्त तीन महिला मोलकरणी काम करत होत्या.
advertisement
पोलिसांची 24 तासांत कामगिरी
या प्रकरणी तक्रार दाखल होताच माटुंगा पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि सखोल चौकशीच्या आधारे पोलिसांना तीन मोलकरणींपैकी कविता शिंदेवर संशय बळावला. चौकशीदरम्यान कविताने चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून माटुंगा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
