कठीण परिस्थितीला संयमाने दिलं तोंड, आजवर 900 एकरवर केली फवारणी, दहावी पास ड्रोन दीदीची प्रेरणादायी कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
19 वर्ष गृहिणी म्हणून घर सांभाळणाऱ्या दहावी शिक्षित मनीषा या आता ड्रोन पायलट बनल्या आहेत. कठीण परिस्थितीला संयमाने तोंड देत संधीचं सोनं करणाऱ्या ड्रोन पायलट मनीषा पाटील यांची प्रेरणादायी कहाणी आज लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
1/7

सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात महिला आपल्या कामगिरीने यशाची झेप घेत आहेत. त्यात शेती क्षेत्र देखील मागे राहिलेले नाही. अनेक महिला आधुनिक तंत्रज्ञान अवगत करत कृषी क्षेत्रात नव्याने भरारी घेत आहेत. सांगलीतील मनीषा पाटील या यापैकीच एक आहेत. 19 वर्ष गृहिणी म्हणून घर सांभाळणाऱ्या दहावी शिक्षित मनीषा या आता ड्रोन पायलट बनल्या आहेत. कठीण परिस्थितीला संयमाने तोंड देत संधीचं सोनं करणाऱ्या ड्रोन पायलट मनीषा पाटील यांची प्रेरणादायी कहाणी आज लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
2/7
मनिषा महादेव पाटील या सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द गावच्या रहिवाशी आहेत. भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या बॅचमध्ये मनिषा यांची निवड झाली होती. देशातील सर्वात मोठी रासायनिक खते उत्पादक कंपनी असलेल्या इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) ने प्रशिक्षित केलेल्या महिलांच्या पहिल्या गटातून त्यांनी 'ड्रोन पायलट'चे प्रशिक्षण पूर्ण केले. वर्षभरापासून त्या ड्रोन पायलट म्हणून काम करत आहेत. त्यांनी आजवर 900 एकरवर ड्रोन फवारणी केल्याचे लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
3/7
दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मनीषा पाटील गृहिणी होत्या. लग्नानंतर घर व मुलांसह त्या शेती आणि किराणा मालाचे दुकान सांभाळत होत्या. काही काळ त्यांनी शिलाई मशीन देखील चालवली. मनिषा यांच्या लग्नाला 19 वर्षे झाली. या काळात त्यांनी घर सांभाळत संसाराला आर्थिक हातभार लावण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु ग्रामीण भागात राहणाऱ्या मनिषा यांना म्हणावा तितका आर्थिक फायदा होत नव्हता. शासकीय योजनेचा लाभ केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या 'नमो ड्रोन दिदी' योजनेची माहिती मिळताच मनिषा पाटील यांनी पती महादेव यांच्या पाठिंब्याने योजनेसाठी अर्ज केला. ऑनलाईन अर्ज सादर करणे, मुलाखत, त्यानंतर 15 दिवसांचे निवासी प्रशिक्षण असे टप्पे पूर्ण केले. त्यानंतर मनिषा पाटील यांना ड्रोन पायलटचा परवाना आणि काहीच दिवसात ड्रोन मिळाला.
advertisement
4/7
प्रशिक्षणावेळी आईची परीक्षा मनिषा पाटील यांना ड्रोन पायलटच्या निवासी प्रशिक्षणासाठी पुणे येथे जावे लागणार होते. ड्रोन पायलट बनण्याच्या प्रवासातील हा अतिशय महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा होता. याच प्रसंगाची हृदयद्रावक आठवण मनिषा यांनी संगितली. ड्रोन पायलट बनण्यासाठी निवासी प्रशिक्षण घेणे गरजेचे होते. परंतु यावेळी माझे बाळ केवळ दीड वर्षांचे होते. त्याची तब्येत ठीक नसल्याने तो आईला सोडून राहत नव्हता. परंतु प्रशिक्षणाच्या ठिकाणी बाळाला सोबत नेण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे काळजावरती दगड ठेवून प्रशिक्षण पूर्ण केले, असं मनिषा सांगतात.
advertisement
5/7
प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर महिनाभराच्या आतच बाळ प्रणवची गंभीर शस्त्रक्रिया केली. आपल्या आजारी बाळाला नवऱ्याजवळ ठेवून मुलाच्या भविष्यासाठी हातभार म्हणून धडपडणाऱ्या आईची नेमकी प्रशिक्षणावेळीच कठीण परीक्षा ठरली. परंतु अत्यंत भावनिक प्रसंगी मनिषा पाटील यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. आज माझे बाळ ही ठणठणीत आहे आणि मी ड्रोनही उत्तम फ्लाय करते, असं मनिषा अभिमानाने सांगतात.
advertisement
6/7
जगण्याला मिळाली नवी ऊर्जा : दहावीपर्यंतचे शिक्षण आणि दोन मुलांसह कुटुंबाची जबाबदारी यामुळे काही करेन असे वाटले नव्हते. परंतु लग्नानंतर 19 वर्षांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळाली. पतीच्या पाठिंब्याने संधीचं सोनं करू शकले. याबद्दल समाधान वाटत असल्याचे मनिषा सांगतात. ड्रोन पायलट बनल्यानंतर जगण्याला नवी ऊर्जा मिळाली आहे. आई म्हणून जबाबदाऱ्या पेलताना उत्साह वाटत असल्याचे त्या सांगतात.
advertisement
7/7
मिळाले आर्थिक धैर्य : एका एकर ड्रोन फवारणीसाठी 600 रूपये आकारले जातात. मनिषा यांना या वर्षाभरामध्ये ड्रोन मिळाला. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 900 एकर क्षेत्रात ड्रोन फवारणी केली आहे. गावासह परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून ड्रोन फवारणीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता मिळालेल्या शासकीय योजनेच्या लाभामुळे ड्रोन पायलट मनिषा पाटील यांना आर्थिक धैर्य मिळते आहे. सुरुवातीला अनेक अडथळ्यांना जिद्दीने तोंड देत मनिषा पाटील ड्रोन पायलट बनल्या. 19 वर्ष गृहिणी असलेल्या मनीषा यांनी स्वप्नातही न पाहिलेले ड्रोन पायलटचे स्वप्न त्या वास्तवात जगत आहेत. पतीच्या पाठिंब्याने योजनेचा लाभ घेत त्या सक्षमपणे संसारास आर्थिक हातभार लावतात. गाव आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे ड्रोनद्वारे औषध फवारणी करत आहेत. आत्मविश्वासाने आधुनिक तंत्रज्ञान पेलणाऱ्या ड्रोन पायलट मनीषा पाटील कित्येक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
कठीण परिस्थितीला संयमाने दिलं तोंड, आजवर 900 एकरवर केली फवारणी, दहावी पास ड्रोन दीदीची प्रेरणादायी कहाणी