Success Story: 'मुलगी आहेस, पुण्यात कशाला जाता?' म्हणणाऱ्यांना गीताने खाकी वर्दीतून दिलं उत्तर; वाचा एका जिद्दी PSI ची गोष्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गीता हाके या शेतकरी कुटुंबातील मुलीने खो-खोमध्ये राष्ट्रीय पदके जिंकून, फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेतले आणि PSI म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती मिळवली.
advertisement
1/8

"मुलगी आहेस, पुण्यात कशाला जाते? तिथे वातावरण बिघडतं, त्यापेक्षा इथेच काहीतरी कर..." गीता हाके जेव्हा शिक्षणासाठी पुण्याला जायला निघाली, तेव्हा लोकांनी इतक्या वाईट भाषेत सुनावलं. पण गीताच्या डोळ्यांत स्वप्नं होती आणि तिच्या आई-वडिलांच्या मनात आपल्या लेकीवर असलेला अढळ विश्वास. आज त्याच विश्वासाचं सोनं झालं असून गीता हाके 'पोलीस उपनिरीक्षक' (PSI) म्हणून रुजू झाली आहे.
advertisement
2/8
गीताचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शेतात राबणाऱ्या बापाचे कष्ट तिने जवळून पाहिले होते. शाळेत असतानाच तिला खो-खो या खेळाची गोडी लागली. मैदान गाजवणं हे जणू तिच्या रक्तातच होतं. जिद्दीच्या जोरावर ती एकदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा नॅशनल खेळली.
advertisement
3/8
राष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावून तिने आपल्यातील खेळाडू सिद्ध केला होता. मैदानातील याच चिकाटीचा उपयोग तिला पुढे आयुष्याच्या संघर्षात झाला. गीता अभ्यासातही तितकीच हुशार होती. दहावीत तिला ९२.२० टक्के मिळाले. नातेवाईक आणि मित्रमंडळींनी सल्ला दिला की सायन्सला जा. पण गीताच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं.
advertisement
4/8
तिला अधिकारी बनायचं होतं आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती. म्हणूनच सर्वांचा विरोध डावलून तिने आर्ट्सला अॅडमिशन घेतली. १२ वीतही तिने ९६ टक्क्यांसह यश मिळवलं आणि पुण्याच्या नामांकित फर्ग्युसन कॉलेजमधून २०२० मध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
advertisement
5/8
ग्रॅज्युएशन सुरू असतानाच गीताने पीएसआयचा फॉर्म भरला होता. अभ्यास आणि खेळाचा सराव यांचा मेळ घालत तिने पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, नशिबाने थोडी परीक्षा घेतली; तिचं नाव वेटिंग लिस्टला लागलं. हार मानतील त्या गीता कसल्या? तिने अभ्यास सुरूच ठेवला आणि २०२१ च्या परीक्षेतही मोठं यश संपादन केलं. दरम्यान, २०२० च्या वेटिंग लिस्टचा निकाल लागला आणि तिची पीएसआय पदी नियुक्ती झाली.
advertisement
6/8
गीता जेव्हा साध्या वेशात असते, तेव्हा तिचं शांत आणि संयमी रूप पाहून अनेकजण तिला उपहासाने म्हणायचे, "तू पीएसआय आहेस असं वाटतंच नाही." पण अशा लोकांना गीताने काहीही न बोलता आपल्या कष्टाने 'धप्पा' दिला आहे. २०२५ मध्ये तिचं खडतर ट्रेनिंग पूर्ण झालं आणि आता ती महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय म्हणून दिमाखात कार्यरत आहे. तिची पहिली पोस्टिंग छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे.
advertisement
7/8
"आज मला माझ्या आई-वडिलांचा अभिमान वाटतो. ज्या विश्वासाने त्यांनी मला पुण्यात पाठवलं, त्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही. त्यांच्या कष्टाचं चीज झालं, हे पाहून मिळणाऱ्या समाधानापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही," अशा भावना गीता व्यक्त करते.
advertisement
8/8
एका शेतकऱ्याची मुलगी आज पोलीस अधिकारी बनून समाजाचं रक्षण करायला सज्ज झाली आहे. गीताचा हा प्रवास महाराष्ट्रातील प्रत्येक त्या मुलीसाठी प्रेरणादायी आहे, जिला काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story: 'मुलगी आहेस, पुण्यात कशाला जाता?' म्हणणाऱ्यांना गीताने खाकी वर्दीतून दिलं उत्तर; वाचा एका जिद्दी PSI ची गोष्ट