मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 99 वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे देशभरातून शिवसैनिक जमा झाले आहेत. अशातच माजी महापौर महादेव देवळे यांनी देखील स्मृतीस्थळी येत शिवसेना प्रमुखांना अभिवादन केलं. त्यानंतर लोकल18 सोबत बोलताना त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 2002 ते 2005 साली मुंबईचे महापौर राहिलेले महादेव देवळे शिवसैनिकांसोबत स्मृतीस्थळी आले होते. यावेळी बाळासाहेबांची शिकवण नेहमीच आचरणात आणली आहे. बाळासाहेबांमुळे मराठी माणूस हा स्वाभिमानाने जगत आहे. बाळासाहेब यांनी मराठी माणसासाठी केलेले कार्य मोलाचे आहे. बाळासाहेबांचा शब्द हा शब्द असायचा. एकदा शब्द दिला की ते त्यावर ठाम असायचे. त्यामुळेच आजही लोक त्यांच्या कार्याची दखल घेतात. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त हजारो लोक छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे येतात, असे देवळे म्हणाले.
advertisement
‘सामना’ची प्रत अन् दीड मिनिटांचा तो कॉल, कट्टर शिवसैनिकाने सांगितला बाळासाहेबांसोबतचा प्रसंग
बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले
शिवसैनिक अजय पेंडुलकर म्हणाले की, “माझ्या नोकरीसाठी जेव्हा मला गरज होती तेव्हा त्यांनी मला खूप मदत केली होती. 1974 आणि 75 साली मला खूप गरज होती. तेव्हा माझ्यासोबत न्याय देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिले. याच गोष्टीचा विसर मी आणि माझे कुटुंब कधीच पडू देणार नाही. त्यामुले दरवर्षी बाळासाहेबांच्या जयंतीला छत्रपती शिवाजी पार्कवर अभिवादन करण्यासाठी येत असतो.”
आम्ही नेहमीच एकनिष्ठ
आणखी एक शिवसैनिक यशवंत सालेकर म्हणाले की, “आम्ही बाळासाहेबांशी आणि शिवसेनेची एकनिष्ठ आहोत. आम्ही इथे तिथे पळून जाणारे किंवा सोडून जाणाऱ्यांपैकी नाही आहोत. मी साहेबांना माझा गुरु मानतो आणि नेहमीच त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी इथे येत असतो.”