स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथीची सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विकास गायकवाड यांनी आज अधिकृतपणे शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या घटनाक्रमामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
advertisement
विकास गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय भूमिका बजावत होते आणि सुनील तटकरे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने तटकरे यांच्यासाठी हा अनपेक्षित धक्का मानला जात आहे. राजकीय वर्तुळात यावर चर्चा रंगली असून, मंत्री भरत गोगावले यांनीही हा डाव तटकरे यांच्याच पद्धतीने खेळल्याची चर्चा आहे.
भरतशेठने शड्डू ठोकला, दिवाळीनंतर आणखी फटाके फुटणार...
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने रायगडमध्ये राष्ट्रवादीला रोखण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे, महायुतीतीलच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात आता थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची आणि रोमहर्षक होणार आहे हे आता स्पष्ट होत आहे.
शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले म्हणाले, “ही तर सुरुवात असल्याचे म्हटसे. दिवाळीनंतर आणखीन काही राजकीय फटाके फुटतील.” त्यांच्या या वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.