मुंबई: प्रत्येक मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 99 वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील शिवसैनिक विविध कार्यक्रमांतून त्यांना अभिवादन करत आहेत. मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले असून आपल्या आठवणींना उजाळा देत आहेत. लोकल18 च्या माध्यमातून शिवसैनिकांच्या भावना जाणून घेऊ.
advertisement
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला होता. यंदा त्यांचे 99 वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी सातारा जिल्ह्यातील कराड येथून महेश पाटील आणि संभाजी जगताप हे शिवसैनिक आले आहेत. हे दोघेही स्वत:ला कट्टर शिवसैनिक म्हणवून घेतात. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या काही आठवणींना उजाळा दिला.
ठाकरेंचे 6 खासदार फुटणार, 'ऑपरेशन टायगर'वर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महेश पाटील हे बाळासाहेबांचे कट्टर अनुयायी आहेत. 23 जानेवारी 1989 रोजी प्रदर्शित झालेली सामना वृत्तपत्राची पहिली प्रत त्यांनी अजूनही जपून ठेवली आहे. एवढेच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत केलेल्या एसटीडी संभाषणाचे बिल देखील प्रिंटेड स्वरूपात त्यांनी त्यांच्याकडे जतन करून ठेवले आहेत. तसेच बाळासाहेबांच्या इतरही आठवणी त्यांनी जपल्या असून त्यांच्यासह ते स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले आहेत.
कराडहून शिवसैनिक संभाजी जगताप हे देखील छत्रपती शिवाजी पार्क येथे दाखल झाले आहेत. जवळपास गेल्या सोळा-सतरा वर्षांपासून ते दरवर्षी न चुकता छत्रपती शिवाजी पार्क येथे येतात. यंदा देखील रात्री 9 वाजता कराड वरून त्यांनी बस पकडून प्रवास सुरू केला आणि सकाळी पाच वाजता मुंबई पोहोचले. एवढेच नव्हे तर अमरावतीचे गोवर्धन काळे देखील दरवर्षी इथे न चुकता बाळासाहेबांना मानवंदनासाठी येत असतात. आज जन्मदिन निमित्त हजारो शिवसैनिक हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दाखल झाले आहेत. प्रत्येकाकडे बाळासाहेबांच्या काही खास आठवणी असून त्याबाबत ते भरभरून बोलत आहेत.