सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्यासाठी पुणे महानगरपालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणातर्फे आयोजित 31 वी किल्ले स्पर्धा आणि प्रदर्शन यंदा 17 ते 26 ऑक्टोबरदरम्यान छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रोड येथे भरवण्यात आले आहे.
1992 पासून ही किल्ले स्पर्धा आणि प्रदर्शन परंपरेने आयोजित केली जात असून याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, भूगोल आणि कला याबद्दलची आवड निर्माण करणे तसेच पारंपरिक किल्ले संस्कृतीचा वारसा जपणे हा आहे. या वर्षीच्या स्पर्धेत तब्बल 50 हून अधिक किल्ल्यांची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी 500 हून अधिक विद्यार्थी आणि विविध शैक्षणिक संस्था उत्साहाने सहभागी झाल्या आहेत.
advertisement
मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले की, खेड्यातील मुलांना मातीशी नैसर्गिक नाते असते पण शहरातील मुलांचा मातीशी संपर्क तुटत चालला आहे. किल्ले बनवताना त्यांना मातीची ओळख होते, पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते आणि आपल्या इतिहासाबद्दल अभिमानही निर्माण होतो.
स्पर्धेचे आयोजन सहा गटांमध्ये करण्यात आले असून प्रत्येक गटातील सर्व सहभागींना बक्षिसे दिली जाते. ही स्पर्धा आणि प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून 26 ऑक्टोबरपर्यंत सर्व नागरिकांना हे किल्ले पाहता येतील. प्रदर्शनात शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे.
किल्ल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिवकालीन गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव साकारले आहे. सिंहगड, प्रतापगड, राजगड, तोरणा, लोहगड अशा प्रसिद्ध किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनी किल्ले तयार करताना प्लास्टिकऐवजी माती, गवत, लाकूड यांसारख्या नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला आहे,ज्यातून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला जात आहे.
या उपक्रमामुळे पुण्यातील मुलांमध्ये इतिहासाबरोबरच कला, सर्जनशीलता आणि जबाबदारीची भावना विकसित होत आहे. दिवाळीच्या सणात साकार होणारे हे किल्ले फक्त मातीचे नव्हे, तर संस्कृतीच्या वारशाचे प्रतीक ठरत आहेत.