वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीत काल संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात दिव्या सूर्यवंशी हिचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला आहे. मात्र दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. मूळची धुळे जिल्ह्यातील तसेच शेतकरी कुटुंबातील असलेली दिव्या भाऊसाहेब खैरनार ही उच्चशिक्षित असून तिचा विवाह जवळपास तीन वर्षांपूर्वी हर्षल शांताराम सूर्यवंशी या आयटी इंजिनीअर तरुणांशी झाला होता.
advertisement
लग्नात ४० तोळे सोनं तरी सासरचा हावरेपणा संपेना
मुलगा पुण्यात नोकरी करत असल्याने आई- वडिलांनी मुलीचे लग्न थाटामाटात करून दिले. लग्नात ४० तोळे सोनं दिलं तसेच लग्नासाठी जवळपास २० लाख रुपये खर्च करण्यात आला. अधिक महिन्यात देखील अंगठी दिली. तसेच लग्नानंतर मुलीला चांगली नोकरी लागावी यासाठी एक कोर्स केला. त्या कोर्सचे जवळपास 1 लाख रुपये देखील दिले. लॅपटॉप देखील घेऊन दिला. मात्र तरी देखील नोकरी मिळत नाही, म्हणून सासरच्या मंडळीनी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला.
सासरच्यांनी जीव घेतला, कुटुंबियांचा आरोप
लग्न झाल्यानंतर दिव्या आपल्या पती हर्षलसोबत वाकड येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. मात्र तिचा पती हर्षल सूर्यवंशी वारंवार या ना त्या कारणाने तिला टॉर्चर करत होता. अलीकडेच त्याने दिव्याच्या कुटुंबीयांकडे सोन्याच्या अंगठीची मागणी ही केली होती. तसेच घरातील फर्निचर बनवण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावून दिव्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा जाच तिला असह्य झाला. यातूनच 27 वर्षीय दिव्याचा जीव गेला.
या प्रकरणात आता दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि तिच्या सासरच्या मंडळी विरोधात दिव्याचे कुटुंबीय वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . दिव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबीयांना विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतक दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे.