यंदा भीमथडी जत्रेतील एक प्रमुख आकर्षण म्हणजे तब्बल दीड लाख रुपये किमतीची पैठणी. येवला येथील साई कला पैठणी या स्टॉलवर या खास पैठणी सादर करण्यात आल्या असून 12 हजारांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या पैठणी येथे उपलब्ध आहेत. गेली 15 वर्षे या व्यवसायात असलेल्या अशोक राऊत यांनी पैठणीविषयी सविस्तर माहिती दिली. राऊत यांनी सांगितले की, "ओरिजनल पैठणी ही पूर्णपणे हँडमेड असते. या साड्यांमध्ये प्युअर रेशीम आणि प्युअर जरीचा वापर केला जातो. कला-कुसर जितकी अधिक आणि जटिल, तितकी पैठणीची किंमत वाढते."
advertisement
"पारंपरिक पद्धतीने विणलेली पैठणी ही पूर्णपणे ट्रॅडिशनल असून तिचे सौंदर्य वर्षानुवर्षे टिकून राहते. ओरिजनल पैठणी ओळखायची असेल, तर साडीची मागची बाजू पाहावी. खरी पैठणी ही मागच्या बाजूनेही पुढील बाजूसारखीच मिरर वर्क दिसते. याउलट सेमी पैठणीमध्ये धागे दिसतात आणि विणकाम पूर्णपणे समान नसते.", असं शेवटी राऊत यांनी सांगितले. या स्टॉलवर नारळी किनार असलेली पैठणी, मुनिया, सिंगल मुनिया, ट्रिपल मुनिया, मोर-पोपट डिझाइनची बॉर्डर, हाफ डिझाईन तसेच ऑल वर्क पैठणी उपलब्ध आहेत. या सर्व प्रकारांमध्ये रंगसंगती, जरीचे काम आणि पारंपरिक नक्षीकाम पाहायला मिळते.
त्यामुळे नववधूंसह सण-समारंभासाठी पैठणी खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. भीमथडी जत्रा केवळ खरेदीचे ठिकाण नसून ग्रामीण आणि शहरी संस्कृतीला जोडणारा दुवा ठरत आहे. महिला उद्योजिकांना व्यासपीठ मिळण्यासोबतच नागरिकांना अस्सल आणि दर्जेदार उत्पादनांची ओळख करून देणारी ही जत्रा पुणेकरांसाठी एक वेगळाच अनुभव ठरत आहे.