विवाहाच्या अक्षता पडल्या, पण पंगत उठलीच नाही
बुधवारी काटेवाडीतील अभिजित भिसे या युवकाचा विवाह सोहळा बारामतीत संपन्न झाला. या आनंदाच्या क्षणासाठी ५०० हून अधिक नातेवाईक आणि ग्रामस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. विवाहाचे धार्मिक विधी सुरू असतानाच अजित दादांच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावात आनंदाचे वातावरण असतानाच या बातमीने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. केवळ धार्मिक विधी उरकून हा विवाह पार पडला, मात्र विवाहासाठी तयार केलेले ५०० जणांचे भोजन तसेच पडून राहिले. "आमचा आधार गेला" अशा भावना व्यक्त करत एकही वऱ्हाडी जेवला नाही, अशी माहिती स्थानिक युवक आकाश भिसे यांनी दिली.
advertisement
गावातील एकाही घरात पेटली नाही चूल
केवळ विवाह सोहळाच नव्हे, तर संपूर्ण काटेवाडी गावाने काल दिवसभर अन्नत्याग केला. गावातील एकाही घरात बुधवारी चूल पेटली नाही. सकाळपासून शेतीची कामे करणाऱ्या हातांनी बातम्या ऐकताच कामं सोडून बारामतीची वाट धरली. महिलांनी घराबाहेर पडणे टाळले, तर तरुण मुले दुचाकीवरून तातडीने बारामती मेडिकल कॉलेजच्या दिशेने रवाना झाली.
'काटेवाडी पॅटर्न' आरोग्य केंद्रातही शांतता
अजित दादांनी अत्यंत आस्थेने उभारलेले काटेवाडीचे प्राथमिक आरोग्य केंद्र, जे राज्यात 'काटेवाडी पॅटर्न' म्हणून ओळखले जाते, तिथेही काल शुकशुकाट होता. जिथे दररोज १००-१५० रुग्णांची वर्दळ असते, तिथे काल फक्त ६ जण आले. विशेष म्हणजे, हे सहा जणही दादांच्या निधनाचा धक्का बसल्यामुळेच उपचारासाठी आले होते, अशी माहिती डॉ. वैशाली देवकते यांनी दिली.
चार दिवसांपूर्वीची ती विचारपूस शेवटची ठरली
"गेल्या शनिवारीच दादा पालखी मार्गावर थांबले होते. त्यांनी प्रत्येकाची विचारपूस केली होती. त्यांच्यामुळेच काटेवाडीला वेगळी ओळख आणि किंमत होती," अशा शब्दांत ग्रामस्थ विजयमाला दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, हेच प्रत्येक ग्रामस्थाचे अश्रू सांगत होते.
