तो अर्धा दिवस आणि शेवटचं जेवण
किरण गुजर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पाच दिवसांपूर्वी दादा खूप विचलित होते. ते मला म्हणाले, "किरण, खूप कंटाळा आलाय, आपण दोघे जरा बाहेर जाऊया." आम्ही दोघे अर्धा दिवस बाहेर फिरलो, एकत्र जेवलो. तेच माझं दादांसोबतचं शेवटचं जेवण ठरलं. त्यावेळी ते वारंवार एकच गोष्ट बोलत होते— "बास झालं आता, मला या गोष्टींचा खूप त्रास होतोय." सत्तेच्या राजकारणात कायम सक्रिय राहणारा हा नेता अचानक असा का बोलतोय, हे कोणालाच उमजलं नव्हतं.
advertisement
"मी कोणाचं वाईट केलं?" – मनातील ती सल
लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर बारामतीमध्ये झालेली टीका अजित पवारांच्या मनाला कुठेतरी खोलवर लागली होती. किरण गुजर यांच्या मते, "दादा अत्यंत हळव्या मनाचे होते. ते विचारायचे, मी रात्रंदिवस मरमर काम करतोय, तरी माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय? बारामतीत लोक माझ्यावर टीका का करतात? मी कोणाचं काय वाईट केलंय?" विधानसभा निवडणुकीतही ते उभे राहायला तयार नव्हते, त्यांना खूप समजावून तयार करावं लागलं होतं.
नास्तिकतेकडून श्रद्धेकडे झालेला प्रवास
अजित पवारांच्या सुरुवातीच्या काळात देवाबद्दलचे विचार वेगळे होते. "लहानपणी वडील गेले, कुटुंबावर वाईट परिस्थिती आली, देवानं माझं काय केलं?" असा प्रश्न ते लहानपणी विचारायचे. मात्र, अनुभवाने ते बदलले. देवाबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली होती, पण ती अंधश्रद्धा नव्हती. श्रद्धेचा वापर त्यांनी कधीही राजकारणासाठी केला नाही, असेही गुजर यांनी स्पष्ट केले.
डोळ्यांसमोर काळाचा घाला!
सर्वात भयानक अनुभव म्हणजे, अपघाताच्या काही मिनिटे आधी दादांनी गुजर यांना फोन केला होता. "मी विमानात बसतोय," हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले. गुजर त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच विमानाचा अपघात झाला. "गाडीत मृतदेह ठेवताना मी ओळखलं की हे दादाच आहेत. मला वाटलं काहीतरी वाईट स्वप्न पडतंय, पण ते वास्तव होतं," असे सांगताना गुजर यांना अश्रू अनावर झाले.
