धावपट्टीचा अंदाज चुकला अन् वेग नडला
सकाळी मुंबईहून झेपावलेल्या या विमानाने बारामती विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक ११ च्या बाजूने उतरण्याचा पहिला प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर वैमानिकाने १२ मिनिटांनी दुसरा प्रयत्न केला. पण या वेळी विमानाचा वेग ताशी २६० किलोमीटर इतका प्रचंड होता. सामान्यतः लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या वेगापेक्षा हा वेग अधिक होता. दुसऱ्या प्रयत्नातही धावपट्टी स्पष्ट न दिसल्याने वैमानिकाने शेवटच्या क्षणी लँडिंग रद्द करून विमान पुन्हा हवेत घेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
१६ अंशाचा तो घातक कोन
तज्ज्ञांच्या मते, विमान पुन्हा हवेत नेताना (Take-off) ते सहसा ५ अंशाच्या कोनात वर नेले जाते. मात्र, वेग प्रचंड असल्याने हे विमान १६ अंशाच्या कोनात अचानक वर नेण्याचा प्रयत्न झाला. यामुळे विमानाला हवेत स्थिर राहण्यासाठी लागणारी आवश्यक 'लिफ्ट' (शक्ती) मिळाली नाही आणि विमानाचे संतुलन बिघडून ते थेट जमिनीवर कोसळले.
१४०० लिटर इंधन आणि आगीचा डोंब
हे विमान मुंबईहून बारामतीला आले होते आणि तिथून पुन्हा मुंबईला जाणार होते. त्यामुळे विमानात परतीच्या प्रवासासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारे १.१२ टन (सुमारे १४०० लिटर) इंधन शिल्लक होते. विमान जमिनीवर आदळताच या इंधनामुळे आगीचा भीषण डोंब उसळला, ज्यामुळे विमानातील कोणालाही बाहेर निघण्याची संधी मिळाली नाही.
नेव्हिगेशन आणि 'आयएलएस' सुविधेचा अभाव
बारामती विमानतळावरील सर्वांत मोठी त्रुटी म्हणजे तिथे असलेली 'इन्स्ट्रुमेंटल लॅन्डिंग सिस्टीम' (ILS) चा अभाव. ही यंत्रणा खराब हवामानात किंवा धुक्यात विमानाला रेडिओ सिग्नलद्वारे धावपट्टीच्या रेषेत आणण्यास मदत करते. ही सुविधा नसल्याने वैमानिकाला केवळ स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनच लँडिंग करावे लागले. परिसरात असलेल्या टेकड्या आणि धुक्यामुळे दृश्यमानता अचानक कमी झाली आणि 'आयएलएस' नसल्याने वैमानिकाची दिशाभूल झाली.
